चिंचणी समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची पसंती

चिंचणी समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची पसंती

Published on

चिंचणी समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची पसंती
‘पर्यटनस्थळ’ घोषित करण्याची मागणी; रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची आशा
तारापूर, ता. १८ (बातमीदार) : डहाणू तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रकिनाऱ्यांपैकी चिंचणी आणि वाढवण हे किनारे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत, मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे या परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे किनारे अधिकृत पर्यटनस्थळे म्हणून घोषित केल्यास येथे देश-परदेशी पर्यटक वाढतील आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
डहाणू नगर परिषद क्षेत्र आणि बोर्डी येथील किनाऱ्यांवर सोयीसुविधा असल्याने तेथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्याच धर्तीवर चिंचणी आणि वाढवण येथील स्वच्छ, सुंदर आणि सुरुच्या बागांनी नटलेल्या किनाऱ्यांचा विकास करणे आवश्यक आहे. वाढवण किनाऱ्याला नैसर्गिक वैभवासोबतच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही लाभले आहे. प्रभू रामचंद्रांनी येथे पिता दशरथांचे पिंडदान केले होते, अशी आख्यायिका असल्याने आजही अनेक लोक येथे दर्शनासाठी व धार्मिक विधींसाठी येत असतात. या दोन्ही किनाऱ्यांवर समुद्राची खोली चांगली असल्याने येथे बोटिंगसारखे जलक्रीडा प्रकार सुरू करणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या किनाऱ्यांची पाहणी करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण केल्यास हे परिसर उत्तम पर्यटन केंद्र बनू शकतात, असे मत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
------------------------
चिंचणी आणि वाढवण ही दोन्ही ठिकाणे नयनरम्य आहेत. सरकारने ही ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून घोषित केल्यास परिसराचा चेहरामोहरा बदलेल आणि स्थानिकांना गावातच रोजगार मिळेल.
- धवल धर्ममेहर, स्थानिक ग्रामस्थ, चिंचणी

Marathi News Esakal
www.esakal.com