खोक्याचे राजकारण तापले

खोक्याचे राजकारण तापले

Published on

खोक्यांवरून महायुती लक्ष्य
माजी नगरसेवकांच्या प्रवेशांवरून काँग्रेस आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : महापालिकेतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील माजी नगरसेवकांची संख्या घटली आहे. काँग्रेस पक्षाकडे एकही माजी नगरसेवक राहिलेला नाही. या परिस्थितीला शिवसेना शिंदे, भाजप गटाचे खोक्याचे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप करताना काँग्रेसने थेट महायुतीलाच लक्ष्य केल्याने निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे.
काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदावर माजी परिवहन सभापती रामचंद्र (आबा) दळवी यांची नियुक्ती झाली आहे. याप्रसंगी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीवर खोक्याचे आरोप केले. या आरोपांमुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या नावाखाली माजी नगरसेवक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. या उड्या पाहता आगामी काळात काँग्रेस पक्षाला नक्की भरभराटी येईल, अशी अपेक्षा काँग्रसेचे नवीन जिल्हाध्यक्ष दळवी यांनी व्यक्त केली. तसेच महायुतीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला नागरिक कंटाळले असून, नवी मुंबई महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर विराजमान होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
----------------------------
ठाकरेंकडे दोनच नगरसेवक
नवी मुंबई महापालिकेत २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १० नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५२ नगरसेवकांची ताकद होती. शिवसेनेचे ३८ नगरसेवक होते. शिवसेनेचे शिंदे आणि ठाकर गट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, अजित पवार गट झाल्याने माजी नगरसेवक विभागले गेले आहेत. यात ठाकरे गट आणि काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी गेल्या सहा महिन्यांत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर ऐरोली, बेलापूर मतदारसंघात अवघा एक माजी नगरसेवक शिल्लक आहे. त्यापैकी एम. के. मढवी यांचे तीन नगरसेवक शिंदे सेनेत गेल्यामुळे अवघे दोन माजी नगरसेवकांचे बळ ठाकरे गटाकडे उरले आहे.
------------------------------
काँग्रेसची परिस्थिती वाईट
काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे माजी उपमहापौर अविनाश लाड, त्यांच्या पत्नी माजी प्रणाली लाड नगरसेविका, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे यांनी काँग्रेसला रामराम करीत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर माजी नगरसेविका पुनम पाटील एकमेव नगरसेवक काँग्रेसकडे राहिल्या होत्या, पण जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुनम पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती, परंतु पाटील यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसची परिस्थिती राजकीय पटलावर अतिशय वाईट आहे.
----------------------------------
शिवसेना आणि भाजपने स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करून पक्ष वाढवला आहे. निवडणुकीच्या धर्तीवर एक ते दोन खोके वाटप करून शिंदेसेना, भाजपने फोडाफोडी केली आहे. महायुतीला निवडणुकीत जोरदार फटका बसणार आहे.
- संतोष शेट्टी, अध्यक्ष, काँग्रेस नवी मुंबई निवडणूक समिती
-------------------------------------
पक्षाने ज्या लोकांना भरभरून लोक पक्षाच्या वाईट काळात सोडून गेले आहेत. सध्या निवडणुकीमुळे शहरात धावपळीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊन अध्यक्ष पदाला न्याय देईन.
- रामचंद्र दळवी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
-------------------------------------
देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला आवडत्या पक्षात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा परिस्थितीत खोक्यांचे तथ्यहीन आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम मविआचे नेते करीत आहेत. महायुतीने फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा नागरिकांच्या विकासावर भर दिला आहे.
- डॉ. राजेश पाटील, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, भाजप
---------------------------------------
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झंझावात पाहून प्रभावित होऊन इतर पक्षातील माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. माविआच्या नेत्यांना पक्षातील अपयश रोखता येत नाही. हे लपवण्यासाठी महायुतीवर बिनबुडाचे खोक्याचे आरोप करणे आता सोडून देऊन जनतेची कामे करावी.
- किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, बेलापूर मतदार संघ
़़़़़़़ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com