डायलिसिस मशीनच्या प्रतीक्षेत रुग्ण
डायलिसिस मशीनच्या प्रतीक्षेत रुग्ण
उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणेसह आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता
पेण, ता. १८ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आणि मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले पेण उपजिल्हा रुग्णालय शहरासह ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथे डायलिसिस मशीन उपलब्ध नसल्याने मूत्रपिंड विकारांनी त्रस्त रुग्णांना अलिबाग, नवी मुंबई किंवा मुंबई येथील रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. परिणामी, रुग्णांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढत असून, पेणकरांकडून शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पेण तालुक्यात लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, सध्याचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. डायलिसिस मशीनची अनुपलब्धता ही सर्वात मोठी अडचण ठरत असून, त्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता जाणवत आहे. स्वच्छतेच्या ठेक्यातदेखील अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने रुग्णालयातील स्वच्छतेवर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. या रुग्णालयावर आदिवासी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अधिक उपचारांसाठी अलिबाग येथे जाणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. पेणकरांनी सातत्याने आवाज उठवल्यामुळे डॉक्टरांची उपलब्धता, औषधपुरवठा आणि इमारतीची डागडुजी यासारख्या बाबींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी वाढत्या रुग्णभारामुळे डायलिसिस मशीन आणि पुरेसा कर्मचारीवर्ग तातडीने उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते किरण म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून ही बाब मांडणार असल्याचे सांगितले असून, शासनाने तत्काळ डायलिसिस मशीन व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून पेणकरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.
................
वरिष्ठांशी पत्रव्यवहार सुरू
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय ५० बेडचे असून, भविष्यात ते २०० बेडचे करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या राजपूत यांनी दिली. सध्या मंजूर ११ कर्मचाऱ्यांपैकी केवळ पाच कर्मचारी कार्यरत असून, १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा मात्र तत्काळ उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच डायलिसिस मशीनही येथे उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

