मुख्यमंत्री पदावर राहूनही ठाणेकरांच्या अपेक्षा अपुर्णच
मुख्यमंत्रिपदावर राहूनही ठाणेकरांच्या अपेक्षा अपूर्णच
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः महापालिकेत काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदावर राहूनही एकनाथ शिंदे ठाणेकरांच्या मूलभूत अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी ते आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाण्यात महाविकास आघाडीची (शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट) चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या तीन ते चार दिवसांत जागावाटपाचे स्वरूप स्पष्ट होईल, असे लोंढे यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर कोणासोबत निवडणूक लढायची, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक नेत्यांनाच दिले जाईल, हा पक्षाचा ठाम फॉर्म्युला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात काँग्रेसकडे १५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले असून पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नागरी सुविधांवरून अतुल लोंढे यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. इंदूर पॅटर्नचा केवळ गवगवा केला जात असून प्रत्यक्षात तो अपयशी ठरला आहे. कचऱ्याच्या नावाखाली केवळ कंत्राटदारांची मारामारी सुरू आहे. तसेच पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, आरोग्य सेवा, एसटीपी प्रकल्प आणि मालमत्ता कराचे ओझे यांसारखे गंभीर प्रश्न आजही सुटलेले नाहीत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) वरून एकत्र दिसत असले, तरी त्यांच्यात अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला आहे. ते प्रामाणिकपणे एकत्र लढतील, अशी शक्यता नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचा निर्धार
ठाणे पालिकेत पारदर्शक आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ठोस उपाययोजना करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी इमानदारीने लढणारी आघाडीच यावेळी सत्तेत येईल, असा विश्वास लोंढे यांनी या वेळी व्यक्त केला. या मुलाखतींच्या वेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

