तेलवडे–आंबोली रस्त्यावरील पथदिव्यांचे लोकार्पण
तेलवडे-आंबोली रस्त्यावरील पथदिव्यांचे लोकार्पण
आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील तेलवडे-शिघ्रे पोलिस चौकी ते खार आंबोली या मार्गावर सुमारे ८० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन एलईडी पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा मुरूड-रोहा-अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते पार पडला. श्रीफळ वाढवून लाइट स्विच ‘ऑन’ करत तसेच फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.
नऊगाव आगरी समाज संघटनेच्या मागणीनुसार या रस्त्यावर पथदिवे प्रकाशमान झाले असून, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. रात्री-अपरात्री आजारपण, अंत्यविधी तसेच कामधंदा किंवा बाजारहाटासाठी मुरुडकडे पायी ये-जा करणाऱ्या महिलांना विशेषतः अंधारामुळे व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीमुळे अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर तेलवडे, शिघ्रे नवीवाडी, वाणदे, उंडरगाव, जोसरांजण, आंबोली आदी नऊ गावांतील आगरी समाजाने आमदार दळवी यांच्याकडे पथदिव्यांची मागणी मांडली होती.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हा युवा नेते विघ्नेश माळी, उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, तालुकाप्रमुख नीलेश घाटवळ, शिवसेना बांधकाम संघटनेचे अध्यक्ष दिनेश मिनमिने, तालुका संघटक यशवंत पाटील, राजपुरी जिल्हा परिषद संपर्क प्रमुख जिविता मिनमिने, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, महिला जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील, युवा उपजिल्हाप्रमुख दिपेश वरणकर, नऊगाव आगरी समाज अध्यक्ष प्रवीण बैकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नऊगाव आगरी समाज संघटनेच्या वतीने आमदार महेंद्र दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

