मोखाड्यातील चास सरकारी आश्रमशाळेत रॅगिंग च्या घटना.

मोखाड्यातील चास सरकारी आश्रमशाळेत रॅगिंग च्या घटना.

Published on

मोखाड्यातील सरकारी आश्रमशाळेत रॅगिंगच्या घटना
दोन विद्यार्थ्यांचे डोक्याचे केस, भुवया ब्लेडने काढल्या
मोखाडा. ता. १६ ( बातमीदार ) ः शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये नियमित रॅगिंगच्या घटना घडतात. आदिवासी भागातसुद्धा अशा काही घटना वाढत आहेत. मोखाड्यातील चास येथील सरकारी आश्रमशाळेत, शुक्रवारी (ता. १२) व सोमवारी (ता. १५) डिसेंबरला अज्ञात टवाळखोरांनी गाढ झोपेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस आणि भुवया ब्लेडने काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि पालकांमधे भीतीचे वातावरण आहे.
मोखाड्यातील चास येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेत १ ली ते १० वीपर्यंत वर्ग आहेत. या आश्रमशाळेत ३३१ मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. सदरची आश्रमशाळा निवासी आहे. त्यामुळे आश्रमशाळेत २८० आदिवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था बहुउद्देशीय हाॅलमध्ये करण्यात आली असून, मुले आणि मुलींची वेगवेगळ्या इमारतीमध्ये निवासाची व्यवस्था आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. १२) डिसेंबरला इयत्ता आठवीत शिकत असलेला सुविदास शंकर जाधव (१४) हा मुलगा रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात टवाळखोर मुलांकडून रात्रीच्या वेळेस त्याच्या डोक्यातील केस व डोळ्याच्या भुवया ब्लेडच्या साह्याने काढल्याचा प्रकार घडला. त्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली. ही बाब शिक्षकांच्या कानावर येताच त्यांनी याबाबतीत सर्व मुलांना बोलावून सूचना दिल्या होत्या, मात्र दोन दिवसांनंतर पुन्हा सोमवारी (ता. १५) डिसेंबरला रात्री शक्तिमान शिवराम सोरे या विद्यार्थ्याच्या डोक्यातील केस ब्लेडच्याच साह्याने कापण्यात आले. या दोन विचित्र घटनांमुळे वसतिगृहातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुले झोपेत असताना अचानक ब्लेड कुठे, दुसरीकडे लागले, तर काहीही विपरीत घटना घडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. या प्रकारातील संबंधितांचा शोध अद्याप लागला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
................
वसतिगृहात दोन रॅगिंगच्या घटना घडल्यानंतर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तेव्हापासून अशा घटना घडलेल्या नाहीत. मी स्वतः वसतिगृहात मुक्कामास थांबतो आहे.
पी. पी. सोनवणे, वसतिगृह अधीक्षक, चास आश्रमशाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com