मुरबाडला भविष्यात रेल्वे येणारच
मुरबाडला भविष्यात रेल्वे येणारच
विकास आराखड्यात रेल्वे स्थानकासाठी जागा राखीव
मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारी ''प्रारूप विकास योजना'' प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या अधिकृत नकाशात रेल्वे स्थानकासाठी जागा आरक्षित केल्याने मुरबाडमध्ये भविष्यात रेल्वे येणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नगररचना अधिनियमानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आराखड्यात रेल्वे कनेक्टिव्हिटीवर विशेष भर देण्यात आला आहे. मुरबाडमधील मोठा तलाव परिसरात रेल्वे स्थानकासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी माळी पाडा भागात एक ओव्हरब्रिज, तर मोठा तलाव परिसरात एक ओव्हरब्रिज आणि एक अंडरपास प्रस्तावित करण्यात आला आहे. ही रेल्वे मार्गिका शहराच्या हद्दीपर्यंत दर्शवण्यात आली असून, यामुळे व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.
बाजारपेठेतील अतिक्रमणावर हातोडा?
शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मुरबाड बस स्थानक ते राम मंदिर या रस्त्याची रुंदी १५ मीटर (५० फूट) प्रस्तावित करण्यात आली आहे. २०१७ मध्ये ही रुंदी ३८ फूट होती. ती आता ५० फूट झाल्याने या रस्त्यावरील सुमारे १०० अनधिकृत व्यापारी गाळे आणि अनेक जुनी घरे बाधित होण्याची शक्यता आहे. रस्ता रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात तोडफोड होणार असल्याने व्यापारी आणि घरमालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत
१० डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ही योजना प्रसिद्ध झाली आहे. नागरिकांना या आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी नगरपंचायत कार्यालय किंवा सहाय्यक संचालक नगररचना विभाग, ठाणे येथे नकाशे उपलब्ध आहेत. नागरिकांना या योजनेबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी ३० दिवसांच्या आत मुख्याधिकारी, मुरबाड नगरपंचायत यांच्याकडे लेखी स्वरूपात नोंदवाव्यात.
रस्ते रुंदीकरणाचा आराखडा
विकास योजनेत महामार्गांची रुंदी लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे,
कल्याण-मुरबाड-माळशेज महामार्ग: याची रुंदी तब्बल ६० मीटर (२०० फूट) प्रस्तावित आहे.
शहापूर-मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्ग: ४५ मीटर (१५० फूट) रुंदी.
रिंग रोड: शहराच्या सीमेवरून जाणाऱ्या अर्धवर्तुळाकार रस्त्याची रुंदी ३० मीटर (१०० फूट) असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

