काॅँग्रेस आत्मचिंतन करणार का?

काॅँग्रेस आत्मचिंतन करणार का?

Published on

काॅँग्रेस आत्मचिंतन करणार का?

प्रज्ञा सातव यांच्या भाजपप्रवेशाने पक्षश्रेष्‍ठींच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह


विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या घटनेमुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचे समीकरण बिघडले आहे. तसेच, हा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेस पक्ष विशेषत: गांधी घराण्यासोबत एकनिष्ठ असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, गुलाम नबी आझाद आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांच्या पक्ष सोडून जाण्याचा काँग्रेस नेतृत्वाला, विशेषतः राहुल गांधी यांना मोठा धक्का मानला जात होता. आता या यादीत प्रज्ञा सातव यांचा समावेश झाला आहे. राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर गांधी घराणे प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान राहुल गांधी आणि प्रज्ञा सातव यांच्या भेटीचे छायाचित्र त्यांच्यातील आत्मीयता दर्शवणारे होते.

सातव यांच्या दोन वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षांतर्गत तक्रारी वाढल्या होत्या. कार्यकर्त्यांची फळी उभी न करता त्यांनी निष्ठावंतांना दूर केले. यासंदर्भात हिंगोली तसेच राज्य काँग्रेस नेत्यांनी दिल्लीकडे तक्रारी केल्या. सातव यांना दुसऱ्यांदा संधी देऊ नये म्हणून पहिल्यांदा प्रदेश काँग्रेसचे नेते एकजूट झाले होते. हिंगोलीच्या खासदाराने थेट तक्रार केली हाेती. या तक्रारींनंतरही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गांधी घराण्याशी असलेल्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून सातव यांना दुसऱ्यांदा आमदारकी दिली. त्यानंतर सातव या पक्षापासून पूर्णपणे अलिप्त होत्या. त्या वेगळा निर्णय घेण्याची जाणीव काही काँग्रेस नेत्यांना झाली होती; मात्र सातव यांनी पक्षासोबत संपर्क यंत्रणा तोडून टाकल्यामुळे पक्ष हतबल झाला होता.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तक्रारींची वेळीच दखल घेतली असती तर सातव यांच्याऐवजी विधान परिषदेत दलित किंवा अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देता आले असते. या प्रकरणानंतर तरी पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे म्हणणे ऐकावे, अशी अपेक्षा एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. सध्याचे राजकारण बघता पक्ष साेडून जाणार नाही, याबाबत कुणाची हमी देता येईल का, काँग्रेसने दोन वेळा मुख्यमंत्रिपद देऊनही अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला त्याचे काय, असा सवाल दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

प्रज्ञा सातव यांना दुसऱ्यांदा आमदारकी देण्याचा निर्णय सोनिया गांधी यांचा होता. त्या निर्णयामागे भावनिक कारणे होती, असा दावा दिल्लीतील पक्ष वर्तुळातून करण्यात येत आहे. सातव यांच्या जाण्यामुळे भविष्यात भावनिक निर्णय घेताना पक्षनेतृत्व दहा वेळा विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.
...
प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत बैठक घेऊन सखोल आत्मपरीक्षण करण्यात येईल. ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- नाना पटोले, काँग्रेस नेते
....
दिल्लीतील ‘वाेटचोरी’ सभेच्या यशानंतर वेगळे नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी भाजपने प्रज्ञा सातव यांचा वापर केला आहे. त्यापलीकडे त्यांची कोणतीही राजकीय उपयुक्तता नाही.
- आकाश जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते, काँग्रेस
...
काँग्रेसने यापुढे कुणालाही संधी देताना व्यक्तिगत निष्ठेची बाब बाजूला ठेवून व्यवहार्य निर्णय घेतला पाहिजे. भाजपने ज्याप्रमाणे फिडबॅक देणारी मोठी यंत्रणा उभी केली आहे, ती पद्धत काँग्रेसने येत्या काळात अवलंबवावी.
- हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com