भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सात जखमी

भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सात जखमी

Published on

बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी
भाईंदरमध्ये आठ तास थरार; जेरबंद करण्यात यश

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : भाईंदर पूर्व येथील तलाव रोड या अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात शुक्रवारी (ता. १९) पहाटे बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले. त्यात एक २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
तलाव रोड भागात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तो एका इमारतीत शिरल्याचे दिसले. एका ऑनलाइन मागवलेल्या सामानाची डिलिव्‍हरी देण्यासाठी आलेल्या माणसाने जिन्यात बिबट्या बसला असल्याचे पाहिले. त्याने सर्वांना ओरडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला. तत्काळ पोलिसांना व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यातच बिबट्या येथील पारिजात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात शिरला असल्याचे अग्निशमन दलाला समजताच त्यांनी तिकडे धाव घेतली. त्या वेळी तो बिबट्या घरातील एका तरुणीला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीवर हल्ला करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यातील एका जवानाने बिबट्यावर दांडुक्याने प्रहार केला. त्यामुळे बिबट्या घरातील स्वयंपाकघरात लपून बसला. इकडे घराच्या हॉलच्या एका कोपऱ्यात रक्तबंबाळ अवस्थेत अंजली टाक (वय २२) ही तरुणी बसल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला तातडीने घराबाहेर काढले व दरवाजा बाहेरून बंद केला, तर दुसरीकडे दुसऱ्या जवानांनी खिडकीची लोखंडी ग्रील कापून रक्तबंबाळ अंजलीला बाहेर काढले व तातडीने रुग्णालयात पाठवले. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक भाईंदरमध्ये दाखल झाले. त्यांनी घराच्या खिडकीतून बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन बंदुकीद्वारे टोचून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढले.
...
जखमींची नावे
बिबट्याच्या हल्ल्यात दीपू भौमिक (वय ५२), राकेश यादव (५०), छगनलाल बागरेचा (४८), रामप्रताप सहानी (१९), भारती टाक (५५), खुशी टाक (१९) व अंजली टाक (२२) हे सात जण जखमी झाले. त्यांच्यावर सरकारी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. अंजली हिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com