दहा कामगारांची सुटका

दहा कामगारांची सुटका

Published on

१० कामगारांची सुटका
अंबरनाथमध्ये वेठबिगारीची घटना; कंपनी मालकांविरुद्ध गुन्हा

​अंबरनाथ ता. १९ (वार्ताहर) : शहरात औद्योगिक प्रगतीचे दावे केले जात असतानाच, अंबरनाथ पश्चिमेकडील लादीनाका परिसरात वेठबिगारीचे संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील मजुरांना डांबून ठेवून, त्यांच्याकडून अमानुषपणे काम करून घेत त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या शक्ती फूड इंडस्ट्रीजच्या दोन मालकांविरुद्ध अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादीसह १० कामगारांची सुटका केली आहे.

उत्तर प्रदेशातील ४० वर्षीय कामगार कमलेश फुन्नन बनवाशी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी २०२५पासून फिर्यादी आणि त्यांचे इतर १० सहकारी आरोपी निक्की उर्फ कृष्णा कुमार अग्रहारी आणि नितीन तिवारी यांच्या शक्ती फूड इंडस्ट्रीज या कंपनीत कामाला होते; या मजुरांना चांगल्या रोजगाराचे प्रलोभन दाखवून येथे आणले गेले; मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला नरकयातना आल्या. आरोपी या मजुरांकडून दररोज १५ ते १६ तास सलग काम करून घेत होते. इतकेच नव्हे तर त्यांना पुरेसे जेवण आणि नाश्तादेखील दिला जात नव्हता. एखादा मजूर आजारी पडला तरी त्याला विश्रांती न देता, जबरदस्तीने वेठबिगारासारखे राबवून घेतले जात होते. या ​मजुरांनी जेव्हा पगार मागितला, तेव्हा आरोपींनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी दिली आणि प्रसंगी क्रूरपणे मारहाण करून एका खोलीत डांबून ठेवले. मजुरांचा हा छळ असह्य झाल्याने शेवटी फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीची दखल घेत, अंबरनाथ पोलिसांनी आरोपींविरुद्ध संगनमताने छळ करणे, मारहाण करणे आणि बंधबिगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरातील कामगारवर्गामध्ये मोठी खळबळ माजली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

..
नऊ कामगारांची सुटका
शक्ती फूड इंडस्ट्रीज या कंपनीत कामगारांकडून वेठबिगारीचे काम करून घेत असल्याची माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आली होती. पॅनेलवरील वकील तृप्ती पाटील यांनी कमलेश फुन्नन बनवाशी नामक कामगाराला प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांच्यासमोर गुरुवारी (ता. १८) उभे केला असता त्याने न्यायाधीशांना सर्व घटना सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्या. पाजणकर यांनी हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना पाठवून दिले असता त्यांनी तत्काळ अंबरनाथ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी कामगारांना डांबून ठेवलेल्या ठिकाणी धाव घेत नऊ कामगारांची सुटका केली. या ठिकाणी एकूण २५ कामगारांना फसवून त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जात होती, मात्र काहींनी कसाबसा तेथून पळ काढला, अशी भयानक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात स्वतः न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी यांचे लक्ष असल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com