‘ईव्हीएम’मध्ये छेडछाडीची आरोप

‘ईव्हीएम’मध्ये छेडछाडीची आरोप

Published on

‘ईव्हीएम’मध्ये छेडछाडीचा आरोप
अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापले

अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : नगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उमेदवार शैलेश भोईर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंबरनाथ पश्चिमेकडील सर्वोदयनगर परिसरातील साऊथ इंडियन कॉलेज येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार शैलेश भोईर यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक पाचमधील बूथ क्रमांक ७ ते १२ येथे शुक्रवारी सकाळी मतदान साहित्य वितरणानंतर सायंकाळी बूथची पाहणी करण्यासाठी भोईर हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. या वेळी काही संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर त्यांनी मशीनची तपासणी केली असता सहा ईव्हीएम मशीनचे सील उघडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सहा मशीनमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या भावाने छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही भोईर यांनी केला असून मशीन फोडून मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकारानंतर भोईर यांनी तत्काळ हरकत नोंदवत संबंधित बूथवरील ईव्हीएम मशीन बदलण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही भोईर यांच्याशी संपर्क साधला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

तपासणीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच निवडणूक सहाय्यक अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांनी सांगितले, की ‘प्राथमिक तपासणीत सर्व सहा बूथवरील मशीन सीलबंद असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सविस्तर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, तसेच दोषींवरही कारवाई करण्यात येईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com