जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेत वाटाघाटी
जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेत वाटाघाटी
५० जागांच्या मागणीमुळे पेच वाढला
ठाणे, ता. २० : आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची दुसरी महत्त्वाची फेरी शुक्रवारी (ता. १९) पार पडली. या बैठकीत काही जागांवर एकमत झाले असले तरी महत्त्वाच्या प्रभागांवरून दोन्ही पक्षांत मोठ्या वाटाघाटी सुरू असल्याचे समोर आले आहे. भाजपने ५० जागांची आग्रही मागणी केल्याने युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यात पेच निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने ठाण्यातील मध्यवर्ती भागासह वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि लोकमान्यनगर यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये अधिक जागांची मागणी केली आहे. सध्या भाजपचे महापालिकेत २४ नगरसेवक आहेत, मात्र आगामी निवडणुकीत आपला विस्तार वाढवण्यासाठी भाजपने थेट ५० जागांचा आकडा समोर ठेवला आहे.
दुसरीकडे शिंदे सेनेकडे सद्य:स्थितीत ७९ नगरसेवकांचे बलाढ्य संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला ५० जागा सोडणे म्हणजे स्वतःच्या विद्यमान जागांवर पाणी सोडण्यासारखे होईल, असे शिंदे गटातील स्थानिक नेत्यांचे मत आहे. याच कारणामुळे बैठकीत काही जागांवरून दोन्ही बाजूंनी जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. हा तिढा आता वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार असल्याचे समजते. या महत्त्वपूर्ण चर्चेला दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. शिंदे गटाकडून खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, पूर्वेश सरनाईक, हणमंत जगदाळे, तर भाजपकडून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, शहर अध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले उपस्थित होते.
जागावाटपाची दुसरी फेरी पूर्ण झाली असून, कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून ठाणे पालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. येत्या एक-दोन दिवसांत सर्व प्रश्न सुटतील, अशी आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आम्ही जुळे भाऊ
जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत. सोमवारपर्यंत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईल अशी आम्हाला खात्री आहे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले. तर आमच्यात कोणीही मोठा किंवा लहान भाऊ नाही, आम्ही ‘जुळे भाऊ’ आहोत. आगामी निवडणुकीत महायुतीचे ११० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
सोमवारकडे सर्वांचे लक्ष
जागावाटपाचा हा पेच येत्या सोमवारी सुटण्याची शक्यता आहे. भाजपने मागितलेल्या ५० जागांपैकी प्रत्यक्षात त्यांच्या पदरात किती जागा पडतात आणि शिंदे सेना आपले बालेकिल्ले राखण्यात कशी यशस्वी होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

