आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास तात्काळ कारवाई

आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास तात्काळ कारवाई

Published on

अनधिकृत बांधकामे केल्यास तत्काळ पाडकाम
आयुक्त सौरभ राव यांचे कठोर कारवाईचे आदेश
ठाणे, ता. २० : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून संपूर्ण प्रशासन निवडणूक कामात व्यस्त आहे; मात्र या कालावधीचा फायदा घेत शहरात अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांविरुद्ध पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आचारसंहिता काळात विनापरवाना सुरू असलेल्या बांधकामांवर तत्काळ निष्कासनाची कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी सर्व प्रभाग समित्यांना दिले आहेत.

नागरी संशोधन केंद्र येथे शुक्रवारी (ता. १९) आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी यांच्यासह नऊ प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन नवीन बांधकामे होण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तवली आहे.

सर्व सहाय्यक आयुक्तांवर निवडणुकीची जबाबदारी असली, तरी त्यांनी आपापल्या प्रभागात नियमित तपासणी मोहीम राबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. अनधिकृत बांधकाम आढळल्यास ते केवळ तोडले जाणार नाही, तर संबंधित व्यक्तीवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. आचारसंहितेच्या नावाखाली कोणालाही अनधिकृत कामासाठी सवलत दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नागरिकांना पालिकेची ‘साद’
आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकर नागरिकांनाही सजग राहण्याचे आवाहन केले आहे. शहरात कुठेही नवीन अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ महापालिकेकडे तक्रार नोंदवावी. नागरिकांनी दिलेल्या माहितीवर महापालिका प्रशासन तत्परतेने कारवाई करेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com