"एक खिडकी योजना" कार्यान्वित करा
उमेदवारांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवा
मनसेची आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मागणी
ठाणे, ता. २० ः महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी पायपीट करावी लागू नये, यासाठी महापालिकेत तत्काळ ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी शुक्रवारी (ता. १९) महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले.
ठाणे पालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पदयात्रा, वाहन व्यवस्था, जाहीर सभा, कोपरा सभा, मैदानांची उपलब्धता आणि लाऊडस्पीकर अशा विविध कामांसाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. सध्या या परवानग्यांसाठी उमेदवारांना वेगवेगळ्या प्रभाग समित्या आणि कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. निवडणुकीच्या अत्यंत तोकड्या काळात ही धावपळ उमेदवारांना मेटाकुटीला आणणारी ठरते, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ही योजना तत्काळ सुरू करावी. ही काही अवघड गोष्ट नाही, यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
एकाच छताखाली सर्व परवानग्या
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे एकाच छताखाली सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तशीच व्यवस्था पालिकेतही असावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. उमेदवारांना आवश्यक असणारी सर्व ‘एनओसी’ आणि परवानग्या विहित कालावधीत एकाच कक्षात मिळाव्यात. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाने ही प्रक्रिया सुटसुटीत करावी. प्रभाग समित्यांमध्ये फिरायला न लावता मध्यवर्ती ठिकाणी ही व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

