मतमोजणीचा दिवस, बदलापूर ‘अलर्ट मोड’वर

मतमोजणीचा दिवस, बदलापूर ‘अलर्ट मोड’वर

Published on

मतमोजणीसाठी बदलापूर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
वाहतुकीत मोठे फेरबदल; सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण
बदलापूर, ता. २० (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१) होणार आहे. आदर्श विद्यालयात होणाऱ्या या मतमोजणीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून, शहरात होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष अधिसूचना जारी केली आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर ‘नो एंट्री’ राहणार आहे.

वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या आदेशानुसार, कर्जतहून गांधी चौकमार्गे बदलापूर शहरात येणाऱ्या वाहनांना आमदार मिसळ चौक येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने म्हाडा कॉलनीमार्गे डी.जी. १ मार्गाचा वापर करू शकतील. अंबरनाथ व बदलापूर पश्चिमेकडून आदर्श शाळेकडे जाणाऱ्या वाहनांना जुन्या नगर परिषदेसमोर प्रवेश बंद असेल. वाहनचालकांनी उजवीकडे वळून डी.जी. १ मार्गाचा अवलंब करावा. तसेच कर्जतहून येणारी अवजड वाहने ‘होप इंडिया’ येथे रोखली जातील. अंबरनाथ व बदलापूर पश्चिमेकडून येणाऱ्या अवजड वाहनांना वीर सावरकर पुलावर प्रवेश नसेल. मुरबाडकडून येणारी अवजड वाहने शंकर मंदिर टी-पॉइंट येथे थांबवली जातील.

बदलापूरकरांमध्ये नाराजीचा सूर
योगायोगाने मतमोजणीच्या दिवशी रविवार असल्याने सुट्टीचा आनंद घेणाऱ्या बदलापूरकरांना या वाहतूक बदलांचा फटका बसणार आहे. मतमोजणीच्या तयारीमुळे लागलेल्या निर्बंधांमुळे फिरण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाचे आवाहन
मतमोजणीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com