आरोग्यवर्धक शेवगा हंगामातच गायब
आरोग्यवर्धक शेवगा हंगामातच गायब
बाजारात येण्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी
कासा, ता. २० (बातमीदार)ः पारंपरिक खाद्यसंस्कृतीत शेवगा पोषणमूल्यांचा अमूल्य स्रोत मानला जातो. झाडाच्या शेंगा, पाने, फुले, सालीपर्यंत प्रत्येक घटक पोषणाने परिपूर्ण असल्याने आहारात महत्त्व आहे; मात्र यंदा थंडी सुरू होऊनही बाजारातून शेंगा गायब असल्याचे चित्र आहे.
हिवाळ्यात शेवग्यांच्या शेंगांना मोठी मागणी असते. दोन महिन्यांपूर्वी बाजारात शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत्या; मात्र गेल्या दीड महिन्यापासून त्या बाजारातून पूर्णपणे गायब झाल्या आहेत. डिसेंबर सुरू होऊनही ग्रामीण भागातील शेवग्याची झाडे फुलांनी भरलेली दिसत आहेत; परंतु शेंगा अजून तयार झालेल्या नाहीत. साधारण १५ ते २० दिवसांनंतर शेंगा तयार होण्याची शक्यता आहे. सध्या शहरी भागात शेवगा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून किलोला २५० ते ३०० रुपये दराने विकला जात आहे; मात्र गावखेड्यात शेवगा बहरलेला नसल्याने थंडीत शेंगांची चव चाखता आलेली नाही.
---------------------------------
रक्तदाबावर उपयुक्त
शेवग्याचे झाड केवळ अन्नाचा स्रोत नसून नैसर्गिक औषधालय आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमित आहारात समावेश करावा, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शिअम, पोटॅशियम आणि आयर्न मुबलक प्रमाणात असते. तसेच पानांचे नियमित सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, तर कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.
----------------------------
शेवग्याच्या शेंगांचा डिसेंबरमध्ये बहर येतो. थंडीच्या दिवसात बाजारात चांगला भाव मिळतो; मात्र अजूनही शेंगा तयार झालेल्या नाहीत.
- राजेश वांगड, शेतकरी

