नाताळ गीतांचे घरोघरी स्वर
नाताळगीतांचे घरोघरी स्वर
येशूच्या स्वागताची वसईत जय्यत तयारी
संदीप पंडित ः सकाळ वृत्तेसवा
विरार, ता. २० ः येशूच्या स्वागतासाठी वसईची किनारपट्टी सजू लागली आहे. ख्रिस्ती समाजात घरे रंगवण्यात आली असून दारातील ख्रिसमस ट्रीवरील विद्युत रोषणाईबरोबर येशूच्या जन्माची वर्दी देणारी कॅरल सिंगिंगचे स्वर घरोघरी गुणगुणू लागले आहेत.
वसईच्या गावागावात ‘स्वप्न देवाचे आज हो साकारले...’, ‘बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला...’ आणि ‘नाताळचा सण आमचा हा...’ अशा नाताळगीतांचे स्वर घुमू लागले आहेत. येशू ख्रिस्त जन्मोत्सवाची चाहूल लागताच कॅरल सिंगिंगला सुरुवात झाली असून, या गीतांमधून ख्रिस्तजन्माची शुभवार्ता सादर केली जात आहे. या गीतांना पारंपरिक घुमताने स्वरसाज चढवला जात आहे. कॅरल सिंगिंग तरुणाईचे मुख्य आकर्षण, नाताळ साजरा करण्याचा महत्त्वाचा भाग मानला जातो. वसईतील विविध गावांमध्ये नाताळगीतांचा सराव सुरू असून, घराघरांत ही गाणी गायली जात आहेत. येशूच्या जन्मावेळी देवदूतांनी स्वर्गात गीत गायले. त्यावरून कॅरल सिंगिंगची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.
===================================
मराठीतून सादरीकरण
वसईसह भाईंदर, उत्तन, नालासोपारा, विरार, पालघर, डहाणू, तलासरी भागात ख्रिस्ती समाजाने मराठी भाषा जपली आहे. याठिकाणी येशू जन्माची गाणी मराठीतून गायली जातात. यामध्ये जगी तारक जन्मा आला, चला पाहू त्याला, ईश्वराचा शब्द झाला माणूस, जगाचा मालक जगती आला, घेई घेई जन्म माझे मनी, तुझ्या जन्मदिनी ख्रिस्त बाळा, आज मुक्तीचा चंद्र उगवला, तुटती पाप पाश रे अशा गाण्यांचा समावेश आहे. चर्चतर्फे कॅरल गट तयार करून त्यांचे सादर केले जाते. यासाठी विशिष्ट पोशाख, बॅण्ड आणि सजवलेली वाहने आकर्षण ठरतात.
------------------------------
कॅरल सिंगिंगला ‘घुमट’ची साथ
गोव्यात आठव्या शतकापासून घुमटाचा वापर केला जातो. तेथील मंदिरातून तसेच सांस्कृतिक कार्यावेळी लोकवाद्य वाजवले जाते. घुमट हे प्रामुख्याने गोवा, कोकणातून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांत म्हणजे कर्नाटक, वसईपर्यंत पोहोचले आहे. कोकणात गणेशोत्सव तसेच शिमग्यात त्याचा वापर होतो. आंध्र प्रदेशातही त्याला ‘गुमेरा’ असे म्हणतात.
--------------------------------------
पोर्तुगीज काळापासून हा संगीत वारसा येथे जपला जात असून ख्रिश्चन बांधवाबरोबरच होळी, दहीकाला, लग्नसोहळा असेल किंवा नाताळची वर्दी देणाऱ्या कॅरल सिंगिंगसाठी वाद्यांचा वाजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे.
- विल्यम डिमेलो, घुमट वादक, वसई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

