कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम
पोटेंच्या आरोपांवर रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार
पोटे यांच्यामुळे काँग्रेसचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः कल्याण-डोंबिवलीत पक्षवाढीसाठी सचिन पोटे यांनी कधीही ठोस काम केले नाही. युवकांना पुढे येऊ दिले नाही आणि आता शिवसेनेत गेल्यानंतर काँग्रेसवर आरोप करीत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे, असा काँग्रेसच्या माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे यांनी पलटवार केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे पन्नासहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना आमच्या शुभेच्छा, मात्र त्यांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे. उलट कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचे नुकसान होण्यास पोटेच जबाबदार असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला.
पातकर म्हणाले, की आमच्या पक्षाने काही पदाधिकाऱ्यांना खूप काही दिले, तरीही ते काही कारणांमुळे पक्ष सोडून गेले. कोणत्याही कार्यकर्त्यापेक्षा पक्ष मोठा असतो. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कोणताही धक्का बसलेला नाही. त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी कल्याण-डोंबिवली निवडणुकीत काँग्रेस सर्व ३१ पॅनेलमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
दरम्यान, शहरासह ग्रामीणच्या समस्या अधिकच बिकट झाल्या असून, प्रशासनाचे त्यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून विरोधक संपवण्याचा प्रयत्न सुरू असून, कल्याण-डोंबिवलीत स्वतःचे पदाधिकारी मिळत नसल्याने शिवसेना-भाजप काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडत असल्याचा टोला प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग यांनी लगावला.
मामा पगारे यांची नाराजी
काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे पत्रकार परिषदेदरम्यान काहीसे नाराज दिसून आले. निवडणुकीत त्यांची डोंबिवली विभागीय समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली असली, तरी परिषदेत त्यांना पदाधिकाऱ्यांसोबत बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. मला खुर्चीच दिली नाही तर मी बसणार कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे राहुल गांधी आमची दखल घेतात, मात्र स्थानिक पदाधिकारी दखल घेत नाहीत. पक्षातच दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंतही पगारे यांनी व्यक्त केली.

