कल्याणमध्ये अवतरले ''नयनरम्य विश्व''
कल्याणमध्ये अवतरले ‘नयनरम्य विश्व’
भारताच्या पहिल्या ‘इमर्सिव्ह युनिव्हर्स’ची कल्याणमध्ये सुरुवात
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : मनोरंजन क्षेत्रातील जागतिक दर्जाचा अनुभव आता थेट कल्याणकरांच्या दारात आला आहे. शुक्रवारी (ता. १९) कल्याणमधील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये भारताचे पहिले ‘इमर्सिव्ह युनिव्हर्स’ असलेल्या झिंगव्हर्सचे उद्घाटन झाले. २५ हजार स्क्वेअर फुटांत पसरलेले हे अद्भुत विश्व कला, विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा एक अनोखा संगम आहे.
वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे हे अद्भुत विश्व साकारले आहे. कुटुंब, तरुण पिढी आणि लहान मुले अशा सर्व वयोगटांतील लोकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. झिंगव्हर्समुळे कल्याण शहराला अनुभवात्मक पर्यटनाच्या नकाशावर जागतिक ओळख मिळणार आहे. हे केंद्र लोकांमधील कुतूहल जागृत करण्यासाठी आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे, असे वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव अग्रवाल यांनी सांगितले. त, मुख्य परिचालन अधिकारी नितीन म्हात्रे यांनी म्हटले, की हे ठिकाण मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सुरक्षितता आणि मनोरंजनाचा योग्य ताळमेळ साधणारे एक संस्मरणीय सहलीचे ठिकाण ठरेल. दरम्यान, कल्याणकरांसाठी हे नयनरम्य विश्व खऱ्या अर्थाने एक नवी भेट ठरत असून, पहिल्याच दिवसापासून या केंद्राला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे झिंगव्हर्स?
वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे साकारलेले हे केंद्र केवळ एक संग्रहालय नसून, एक बहुसंवेदी वातावरण आहे. येथे प्रकाश, ध्वनी आणि अवकाश मानवी उपस्थितीला प्रतिसाद देतात. यामुळे अभ्यागतांना एका वेगळ्याच जगात वावरत असल्याचा भास होतो.
प्रमुख आकर्षणे
झिंगडम : ३६० अंश प्रोजेक्शन असलेले हे प्रवेशद्वार थेट अंतराळाची सफर घडवते.
झिंगलो : हे जैविक प्रकाश देणाऱ्या एका काल्पनिक जंगलासारखे असून, लहान मुले आणि फोटोग्राफीप्रेमींसाठी हे विशेष आकर्षण आहे.
झिंगफिनिटी : आरशांच्या आणि प्रकाशाच्या भ्रमातून निर्माण झालेले हे विश्व सामाजिक माध्यमांवरील कंटेंट क्रिएटर्स आणि रील्स बनवणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. येथे एकूण २५ पेक्षा जास्त आकर्षणे असून, प्रत्येक कोपरा काहीतरी नवीन शोधण्याची संधी देतो.

