उल्हासनगरमध्ये भाजप–शिवसेना युतीला ब्रेक? : टीओकेमुळे महायुती अडचणीत
महायुतीला ‘टीओके’चा खो
उल्हासनगरमध्ये राजकीय वातावरण तापले ः भाजपचा शिंदे गटाला स्पष्ट इशारा
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टीम ओमी कलानी (टीओके) हीच महायुतीतील सर्वात मोठी अडचण ठरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती भक्कम असली, तरी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत मात्र टीम ओमी कालानी (टीओके)मुळे या युतीत मोठी दरी निर्माण झाली आहे. जोपर्यंत शिवसेना टीओकेसोबत आहे, तोपर्यंत भाजप कोणत्याही प्रकारच्या युतीत सहभागी होणार नाही, असा स्पष्ट पवित्रा भाजपने घेतल्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधरिया यांच्या उपस्थितीत भाजप प्रवक्ते नरेंद्र राजानी यांनी शिवसेना-टीओके युतीवर थेट निशाणा साधत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कलानी कुटुंबाच्या राजकीय प्रभावावरही घणाघाती टीका केली. १९९० च्या काळात जे राजकीय वजन होते, ते आज उरलेले नाही. आज कलानी कुटुंब केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि त्यामुळेच त्यांना शिवसेनेचा आधार घ्यावा लागत आहे, असे नरेंद्र राजानी यांनी म्हंटले आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, राज्य पातळीवर भाजप-शिवसेना युती असली तरी उल्हासनगरमध्ये टीओकेच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे.
भाजपने टीओकेमुळे उघडपणे युती नाकारल्याने आता चेंडू शिवसेना शिंदे गटाच्या कोर्टात गेला आहे. आगामी काही दिवसांत शिवसेना या युतीवर कायम राहते की महायुतीसाठी नव्या राजकीय गणितांची जुळवाजुळव करते, यावर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिका निवडणुकीआधी राजकीय वातावरण अधिकच तापणार असून, टीओकेच्या विरोधात फिरणारे निर्णयच शहराच्या सत्तासमीकरणांना अंतिम दिशा देणार हे मात्र निश्चित आहे.
भाजपची आक्रमक भूमिका
शिवसेनेने टीओकेला सोबत घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जर भविष्यात टीओकेचा पूर्णपणे शिवसेनेत विलय झाला, तरच परिस्थितीचा पुनर्विचार केला जाईल अन्यथा भाजप स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या वक्तव्यामुळे शहर पातळीवर महायुतीच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे.
पक्षांतर करणाऱ्यांवर टीका
भाजप सोडून शिवसेना-टीओकेमध्ये गेलेल्या माजी नेत्यांवर नरेंद्र राजानी यांनी टीका केली आहे. पक्षाने ज्यांना शून्यातून शिखरापर्यंत नेले, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. मात्र जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

