उल्हासनगरात अंतिम मतदार यादी जाहीर

उल्हासनगरात अंतिम मतदार यादी जाहीर

Published on

उल्हासनगरात अंतिम मतदार यादी जाहीर
२० प्रभाग, ७८ जागा आणि ४.३९ लाख मतदार
प्रभाग ३ सर्वात मोठा, प्रभाग ४ सर्वात लहान; उल्हासनगरची अंतिम मतदार आकडेवारी जाहीर
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या स्पष्ट झाल्याने आता इच्छुक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांची रणनिती ठरवण्याची धावपळ सुरू झाली आहे. तब्बल चार लाख ३९ हजार ९१२ मतदारांच्या सहभागावर ही निवडणूक पार पडणार असून, प्रारूप यादीतील एक हजार ११९ मतदार वगळण्यात आल्याने अंतिम आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष वेधले.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रशासनाने नुकतीच शहराची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील २० प्रभागांमध्ये एकूण चार लाख ३९ हजार ९१२ मतदारांचा समावेश आहे. महापालिकेत एकूण ७८ नगरसेवकांची निवड होणार असून यासाठी २० प्रभागांतून मतदान घेतले जाणार आहे. यापैकी १८ प्रभाग चार सदस्यीय, तर प्रभाग क्रमांक ९ आणि २० हे तीन सदस्यीय असणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ३९ जागा महिलांसाठी आरक्षित असून महिला नेतृत्वाची निर्णायक भूमिका अधोरेखित होणार आहे. उल्हासनगर महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असून, या कालावधीत प्रभाग आरक्षण प्रक्रिया तीन वेळा पार पडली. एकदा आरक्षण प्रक्रियेत झालेल्या त्रुटीमुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागली होती. अखेर अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मतदार यादीही निश्चित झाल्याने निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे.

एक हजार ११९ मतदारांची नावे वगळली
प्रारूप मतदार यादीत चार लाख ४१ हजार ०३१ मतदार नोंदवले गेले होते. छाननीअंती त्यातील एक हजार ११९ मतदारांची नावे वगळण्यात आली असून ही अंतिम यादी आता निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. शहरात संभाव्य दुबार मतदारांची संख्या १४,७३१ इतकी असल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक यादीत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मतदानाच्या दिवशी प्रशासनासमोर काटेकोर नियोजनाचे मोठे आव्हान असणार आहे.

प्रभाग क्रमांक तीन हा सर्वात मोठा
मतदार संख्येच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक तीन हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला असून येथे २८ हजार ६२२ मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक चार हा सर्वात लहान प्रभाग असून तेथे १६ हजार २४१ मतदारांची नोंद आहे. त्यामुळे या दोन प्रभागांकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com