भिवंडीत सर्रास गुटखा विक्री सुरूच

भिवंडीत सर्रास गुटखा विक्री सुरूच

Published on

भिवंडीत सर्रास गुटखाविक्री सुरूच
भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : शासनाने राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री, साठवणूक व सेवनावर कडक बंदी घातलेली असतानाही भिवंडी शहर व ग्रामीण भागात गुटख्याची सर्रास खुलेआम विक्री सुरू असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या या पदार्थांची विक्री रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गुटखा व सुगंधी तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. यामुळेच राज्य शासनाने या पदार्थांवर बंदी घातली आहे. दरम्यान, बंदी लागू झाल्यानंतर गुटख्याचा अवैध काळाबाजार अधिकच फोफावल्याचे वास्तव आहे. काही राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताखाली गुजरात राज्यातून विविध क्लृप्त्या वापरून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे. हा गुटखा भिवंडीत आणून येथून छोट्या वाहनांच्या माध्यमातून ठाणे, मुंबई व आसपासच्या भागात वितरित केला जातो. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यालगत असलेल्या पानटपऱ्यांवर गुटखा खुलेआम लटकवून विक्रीस ठेवलेला दिसून येतो. रस्तोरस्ती गुटखा पुड्यांचे अवशेष व पिचकाऱ्या दिसत असून, सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र गुटख्यावर कारवाई करण्याचे अधिकार असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही वर्षांत ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. भिवंडी शहर व ग्रामीण भागात अन्न निरीक्षक प्रत्यक्षात फिरतानासुद्धा क्वचितच दिसतात, हे विशेष. काही वेळा पोलिसांकडून पानपट्टीचालकांना ताब्यात घेतले जाते, मात्र ‘अर्थपूर्ण तडजोडी’नंतर त्यांची सुटका केली जाते, असा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे कारवाई केवळ दिखाव्यासाठीच असल्याची भावना बळावत आहे. कोरोना काळानंतर भिवंडीत अन्न व औषध प्रशासनाने गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कारवाया करीत कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. मात्र मागील दोन ते तीन वर्षांत या विभागाकडून मोठ्या कारवाया झाल्याचे दिसून येत नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com