पोलिसांबद्दल नकारात्मक प्रसार वाढतोय
पोलिसांबद्दलचा नकारात्मक प्रसार चिंताजनक
प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांचे प्रतिपादन; ठाण्यात पारितोषिक वितरण सोहळा
ठाणे शहर, ता. २० (बातमीदार) ः एकेकाळी समाजात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती होती; मात्र आज चित्र बदलले आहे. यामागे अनेक कारणे असली तरी पोलिसांबद्दल होणारा नकारात्मक प्रसार हे सर्वात मोठे कारण आहे. सकारात्मक घटनांना हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही; मात्र नकारात्मक घटना वारंवार लोकांपर्यंत पोहोचतात. पोलिसांबाबतची ही प्रतिमा बदलण्यासाठी सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ठाणे पोलिस आयुक्तालयातील ३५ पोलिस ठाण्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘माझ्या पोलिस ठाण्याला भेट द्या’ या उपक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते विजेत्या पोलिस ठाण्यांचा गौरव करण्यात आला. विधी सेवा प्राधिकरण, ठाणे पोलिस आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबरला हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. या दिवशी सुमारे १० हजार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पोलिस ठाण्यांना प्रत्यक्ष भेट देऊन पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणि कामकाजाची पद्धत समजून घेतली. जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढवण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे उपसचिव श्रीपाद देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर, ग्लोबल केअर फाउंडेशनचे संस्थापक अबिद अहमद कुंदलाम, एनएसएस जिल्हा समन्वयक जीवन विचारे, सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वकील आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे या वेळी म्हणाले, की अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे ठाणे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पहिले शहर ठरले आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. पोलिस नेहमीच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहतील. जनतेतील अंतर कमी करण्यासाठी ग्लोबल केअर फाउंडेशनने असेच प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विजेते पोलिस ठाणे
लोकसहभाग आणि सादरीकरणात सरस ठरलेल्या खालील तीन पोलिस ठाण्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
प्रथम क्रमांक : महात्मा फुले पोलिस ठाणे (कल्याण)
द्वितीय क्रमांक : कासारवडवली पोलिस ठाणे (ठाणे)
तृतीय क्रमांक : शांतीनगर पोलिस ठाणे (भिवंडी)
इतर पोलिस ठाण्यांनाही त्यांच्या सहभागाबद्दल प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

