स्वतंत्र्य लढण्यावर शिवसेनेचा यू-टर्न

स्वतंत्र्य लढण्यावर शिवसेनेचा यू-टर्न

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत वाढता तणाव आणि माजी नगरसेवकांची संख्या पाहता शिंदे गट आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे वक्तव्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होत होती, मात्र शिवसेनेने वेगळी निवडणूक लढवण्यावर यू-टर्न केला आहे. राज्यात सत्तेत एकत्र असताना वेगळी निवडणूक लढवण्यापेक्षा भाजपसोबत युती करून निवडणूक लढवण्याची भूमिका शिवसेनेने व्यक्त केली आहे. शिंदे सेनेच्या या बदललेल्या विचारांमुळे भाजप नेत्यांच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे.

राज्यात सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर नवी मुंबईत त्याचे पडसाद उमटले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. भाजपशी बरोबरी करण्यात शिवसेनेचा शिंदे गट अधिक प्रबळ मानला जात आहे. विरोधकांकडे उमेदवार शिल्लक राहिले नसल्याने नवीन उमेदवारांवर पक्षाची मदार राहिले आहे. अशा परिस्थितीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र नवी मुंबईत दिसण्यापेक्षा शिवसेना विरुद्ध भाजप असे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत शिंदे गटात माजी नगरसेवकांचे झालेले सलग पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. दुसरीकडे विधानसभेत भाजपला सोडून शरद पवार गटात गेलेले माजी नगरसेवक पुन्हा आल्यामुळे भाजपची ताकद बरोबरीत आली आहे. महायुतीमधील हे दोन्ही पक्ष सत्तेकरिता प्रबळ दावेदार ठरत आहेत.

गेल्या काही महिन्यांत एकमेकांच्या नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वातावरण ताणले गेले आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी कायम नाईकांविरोधात घेतलेला पवित्रा पाहता दोन्ही पक्ष स्वतंत्र्य निवडणूक लढवण्याचे वक्तव्य विविध सभा आणि बैठकांमधून करीत होते, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकारांसोबत बोलताना नवी मुंबईतही महायुतीचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदेसेनेच्या नवी मुंबईतील नेत्यांनीही महायुतीचे संकेत दिले आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र्य लढण्यापेक्षा युती करून एकत्र लढू, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपमध्ये या उलट परिस्थिती असून काही दिवसांपूर्वीच वाशीत पार पडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी भाजपच्या प्रस्थापित माजी नगरसेवकांकडून आल्याचे समजते. या मागणीनुसार स्वबळावर निवडणूक लढवण्याचा एक प्रस्ताव प्रदेशपातळीवरील वरिष्ठांना भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून दिल्याचे नवी मुंबईतील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणाकडे किती नगरसेवकांची ताकद?
नवी मुंबई महापालिकेकडे झालेल्या निवडणुकीत एकसंधी असलेल्या शिवसेनेकडे एकूण ३८ नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपकडे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५२ नगरसेवक आले होते. काँग्रेसकडे १० आणि अपक्ष सहा नगरसेवकांचे बल होते. गेल्या दहा वर्षांत पक्षीय बलाचे समीकरणे बदलले आहेत. शिंदे गटाकडे ठाकरे गट आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी नगरसेवक आल्यामुळे ५० हून अधिक झाली आहे. भाजपकडे ६३ नगरसेवकांहून अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत एकत्र लढल्यास मोठ्या प्रमाणात इच्छुकांना उमेदवारी न दिल्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.

बैठकीत ठरणार
शिवसेनेचे शिंदे गट आणि नवी मुंबई भाजपचे पदाधिकाऱ्यांचे काहीही विचार असले, तरी दोन्ही पक्षांच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी महायुतीमार्फत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्याधर्तीवर आजपर्यंत एकही बैठक झालेली नाही, मात्र आज (ता. २०) बैठक होणार असल्याचे समजते आहे. ही बैठक झाल्यास यात काय चर्चा होते, यावर महायुतीचे भवितव्य ठरेल, अशी उत्सूकता कार्यकर्त्यांना आहे.

नवी मुंबई महापालिकेत १११ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची माजी नगरसेवकांची मागणी आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे पाठवला आहे. सर्वांना सामावून घ्यायचे असेल, तर स्वबळावर निवडणूक लढण्यास दोन्ही पक्षांच्या हिताचे ठरणार आहे, अशी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे.
- डॉ. संजीव नाईक, भाजप निवडणूक प्रभारी, नवी मुंबई

आम्हीसुद्धा आमच्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहोत. नवी मुंबईत भाजपसोबत महायुती करून निवडणूक लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे. राज्य सरकारमध्ये आम्ही भाजपसोबत बसत आहोत. अशा परिस्थितीत नवी मुंबईत स्वतंत्र्य लढले तर वेगळा संदेश जातो. परंतु युतीबाबत वरिष्ठांचा निर्णय बंधनकारक असणार आहे.
- किशोर पाटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com