बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत

Published on

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींना ५० हजारांची मदत
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून जखमींची विचारपूस


भाईंदर, ता. २० (बातमीदार) : भाईंदर येथील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना वन विभागाकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी (ता. २०) बिबट्याने हल्ला केलेल्या पारिजात इमारतीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर भारतरत्न भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. या वेळी नाईक यांच्या हस्ते जखमींना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
मिरा भाईंदरमधील जखमी लोकांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च वन विभाग करेल. त्याचप्रमाणे जखमी झाल्यामुळे ज्यांचा रोजगार बुडाला त्यांनाही वन विभागाकडून नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून घोडबंदरमार्गे बिबट्या या ठिकाणी आला असावा. त्याचे वय चार वर्षे आहे. आईपासून तो वेगळा झाला आहे. तिवरांतून मार्ग काढताना तो गोंधळून लोकवस्तीत शिरला. वन विभागाचे अधिकारी त्याचा तपास करतील आणि भविष्यात असे हल्ले होणार नाहीत याची दक्षता घेतील. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे. या बिबट्याच्या गळ्यात पट्टा लावून त्यावर ट्रॅकिंग डिव्हाईस लावले जाईल. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येईल, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार नरेंद्र मेहता, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते.

परिसरात अद्याप दहशतीचे वातावरण
शुक्रवारी (ता. १९) भाईंदर पूर्व भागातील तलाव रोड भागातील पारिजात इमारतीत बिबट्याने हल्ला करून सात जणांना जखमी केले होते. तब्बल आठ तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले होते. या घटनेचे सावट स्थानिकांवर दुसऱ्या दिवशीही जाणवत होते. बिबट्याच्या भीतीने सकाळच्या वेळी लोक घराबाहेर पडले नाहीत. चांगले उजाडल्यानंतर तेथील वातावरण पूर्वपदावर आले. पारिजात इमारतीबाहेर आजही गटागटाने जमून शुक्रवारच्या घटनेवर चर्चा करताना दिसत होते.

अफवांचे पीक
बिबट्या हल्ला प्रकरणानंतर संपूर्ण भाईंदरमध्ये अफवांना ऊत आला होता. एका भाजीच्या टेम्पोमधून चार बिबटे मिरा-भाईंदरमध्ये आले आहेत. तलाव रोडलगतच असलेल्या भाजी बाजारात हे बिबटे उतरले. त्यापैकी एक बिबट्या पारिजात इमारतीच्या परिसरात आला. मात्र उर्वरित तीन बिबटे अजूनही शहरातच आहेत, अशी चर्चा दिवसभर लोकांमध्ये रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com