भाजपविरोधात एकजूटीचा मंत्र
पनवेल, ता. २० (वार्ताहर) : पनवेल महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने भाजपविरोधात सक्षम व एकसंघ आव्हान उभे करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. आघाडीतील विखुरलेली मते एकत्र आणत सामूहिक लढत उभारण्याचे प्रयत्न सध्या अंतिम टप्प्यात असून, जागावाटप व उमेदवारी निश्चितीसाठी सातत्याने बैठका सुरू आहेत.
शेकापमधील काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीची दखल घेत उरलेल्या घटक पक्षांना एकत्र बांधण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भर आहे. पनवेल येथील मार्केट यार्ड कार्यालयात झालेल्या बैठकीत ‘सर्वांना सोबत घेऊनच निवडणूक लढवायची’, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. या बैठकीत शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी एकसंघतेवर भर देत, अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. काही प्रभागांमध्ये बोलणी यशस्वी झाली असली तरी अनेक प्रभागांबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीस शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे काशिनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सतीश पाटील, समाजवादी पक्षाचे अनिल नाईक, शेकापचे प्रकाश म्हात्रे, मनसेचे प्रवक्ते योगेश चिले तसेच खारघर फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीतून वेगळी लढल्याने पनवेलमध्ये विरोधकांना फटका बसला होता. त्या अनुभवातून धडा घेत या वेळी शिवसेना ठाकरे गटासह खारघर फोरमसारख्या स्थानिक प्रभावी संघटनांना सोबत घेण्याची तयारी महाविकास आघाडीने दर्शविली आहे. त्यामुळे आघाडीच्या बैठकींना खारघर फोरमच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका लीना गरड यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरत आहे.
ठाकरे गट, खारघर फोरमला महत्त्व
मागील निवडणुकांतील आकडेवारीनुसार, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना १,८२,८१८ मते मिळाली होती. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना १,३२,२३५ आणि लीना गरड यांना ४३,५०४ मते मिळाली होती. या मतगणितामुळे आगामी निवडणुकीत जागावाटप करताना ठाकरे गट आणि खारघर फोरमचे महत्त्व वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपविरोधात एकच विरोधी उमेदवार
मनसेसोबत महाविकास आघाडीच्या प्राथमिक पातळीवरील वाटाघाटी सुरू असून, प्रत्येक प्रभागात भाजप उमेदवारांसमोर एकच विरोधी उमेदवार देण्याची रणनीती आखली जात आहे. यामुळे भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न आघाडीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

