माहीम जंक्शन स्थानकातील पादचारी पुलावर शेड नसल्याने प्रवाशांना त्रास
माहीम जंक्शन स्थानकातील पादचारी पुलावर शेड नसल्याने प्रवाशांना त्रास
धारावी, ता. २३ (बातमीदार) : धारावीतील शाहू नगर परिसरातून माहीम जंक्शन स्थानकात जाण्यासाठी उभारण्यात आलेला पादचारी पूल प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असला, तरी या पुलावर शेड नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात तीव्र ऊन, तर पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माहीम जंक्शन हे पश्चिम रेल्वेवरील जुने व महत्त्वाचे स्थानक असून, येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पूर्वी या भागातून स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुख्य पुलाला स्थानकाशी जोडणारा पादचारी पूल उभारला आहे. नव्याने उभारलेल्या या पुलामुळे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते सहा यांना थेट जोडणी मिळाली असून, प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
धारावीतील शाहू नगर, लेबर कॅम्प, अण्णा नगर, ए. के. जी. नगर आदी भागांतील रहिवाशांसह अनेक विद्यार्थी वांद्रे, माटुंगा व दादर येथील शाळा व महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी माहीम स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. याशिवाय, हार्बर लाइनवरून मध्य रेल्वेवर जाण्यासाठी माहीम जंक्शन महत्त्वाचा दुवा असल्याने स्थानकात सतत गर्दी असते. या पादचारी पुलाची मागणी प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीचा दैनिक ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळून हा पूल उभारण्यात आला आहे. मात्र, पुलावर छत (शेड) नसल्याने प्रवाशांना अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलावर तातडीने शेड उभारावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत असून, रेल्वे प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

