सर्दी-खोकल्याचा ताप

सर्दी-खोकल्याचा ताप

Published on

सर्दी-खोकल्याचा ताप
वातावरणातील बदलाचा ठाणेकरांना फटका; रुग्णांमध्ये मोठी वाढ
ठाणे, ता. २३ : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात वातावरणात होणारे बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध विकासकामे आणि बांधकांमांमुळे हवेची गुणवत्ता खालावली असून, याचा थेट फटका ठाणेकरांना बसत आहे. सध्या शहरात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सरकारी आरोग्य केंद्रे तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हवेत गारवा जाणवू लागला होता. मात्र, डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात पुन्हा वाढ झाली. सध्या ठाण्यात तापमानाचा लपंडाव सुरू आहे. सकाळी सातच्या सुमारास तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस असते; मात्र सकाळी ११ नंतर त्यात वाढ होऊन ते २७ ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी गारवा अशा विषम हवामानामुळे नागरिक आजारी पडत आहेत. तसेच सकाळी हवेत प्रदूषणाचे दाट थर पाहायला मिळत असल्याने श्वसनाचे त्रासही वाढले आहेत. वातावरणातील या बदलामुळे अंगदुखी, घसा दुखणे, सर्दी आणि तीव्र खोकला अशा समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. अनेक जण घरगुती उपचार घेत असले, तरी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेलीच आहे.


वातावरणातील बदल आणि प्रदूषणामुळे सध्या सर्दी-खोकल्याची साथ पसरली आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. योग्य खबरदारी घेतल्यास आणि वेळेवर वैद्यकीय उपचार सुरू केल्यास या आजारातून लवकर आराम मिळू शकतो.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

काय काळजी घ्याल?
बाहेर पडताना मास्कचा वापर करा, ज्यामुळे प्रदूषणापासून संरक्षण होईल.
आहारात कोमट पाण्याचा समावेश करा.
अंगात ताप किंवा घसा दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या.

Marathi News Esakal
www.esakal.com