मुरबाडमध्ये म्हसोबा यात्रेची जय्यत तयारी
मुरबाडमध्ये म्हसोबा यात्रेची जय्यत तयारी
म्हसा गावात व्यावसायिकांची लगबग सुरू
टोकावडे, ता. २३ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण संस्कृतीचे वैभव असलेली मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध म्हसोबा खांबलिंगेश्वर यात्रा येत्या ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण म्हसा परिसरात चैतन्याचे वातावरण असून, व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे.
म्हसोबा यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मिठाईच्या दुकानांची उभारणी सध्या वेगात सुरू आहे. मिठाईवाल्यांनी कच्च्या मालाचा साठा करण्यास सुरुवात केली असून, यात्रेसाठी लागणारे पारंपरिक पदार्थ जसे की खाजे, पेठा, हातोली आणि जांभूळ हे पदार्थ बनवण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. म्हैसूर आणि गुलाबजाम यांसारखी मिठाई यात्रेच्या काळात ताजी मिळावी, यासाठी अनुभवी कारागिरांची फौज तैनात करण्यात आली आहे.
मनोरंजनाची साधने दाखल
केवळ धार्मिकच नव्हे, तर व्यापारासाठीही ही यात्रा महत्त्वाची मानली जाते. सध्या परिसरात मोठे पाळणे, झोके आणि सर्कसचे साहित्य दाखल झाले आहे. खेळणी, कपडे, पूजेचे साहित्य आणि घरगुती वस्तूंच्या विक्रेत्यांनी आपली जागा निश्चित केली आहे. परिसरात स्वच्छता आणि मांडव उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
प्रशासकीय नियोजन
दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रेचे नियोजन चोख व्हावे यासाठी स्थानिक प्रशासन आणि शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. रस्ते, पाणी आणि सुरक्षा व्यवस्था यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या म्हसोबा यात्रेबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

