वनश्री शेडगे ठरल्या पहिल्या थेट महिला नगराध्यक्षा

वनश्री शेडगे ठरल्या पहिल्या थेट महिला नगराध्यक्षा

Published on

वनश्री शेडगे ठरल्या पहिल्या थेट महिला नगराध्यक्षा
रोह्यात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; १३ नवे चेहरे सभागृहात दाखल
रोहा, ता. २३ (बातमीदार) ः रोहा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागला असून, पहिल्यांदाच थेट महिला नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे यांची कन्या वनश्री शेडगे यांनी बाजी मारत इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी हा बहुमान मिळवून रोहा नगरपालिकेच्या पहिल्या थेट महिला नगराध्यक्षा होण्याचा मान पटकावला आहे.
रोहा नगरपालिकेत थेट नगराध्यक्षपदाचा पहिला बहुमान १९७२ रोजी डॉ. रमेश राजे यांनी, तर २००१ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ पत्रकार दिलीप राजे यांनी मिळवला होता. त्यानंतर आता प्रथमच महिला नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असताना वनश्री शेडगे यांनी विजय मिळवत नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत नगराध्यक्षपदासह एकूण २० पैकी १८ जागांवर विजय मिळवून नगरपालिकेतील आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. शिवसेना-भाजप युतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर निवडणूक लढवलेल्या सहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर शिवसेना-भाजप युतीने जोरदार लढत दिली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि अपक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मात्र निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले.
...............
विजयी उमेदवार
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्यासह यंदा १३ नवे चेहरे नगरपालिकेत निवडून आले आहेत. यामध्ये निता हजारे, प्रशांत कडू, फरहा पानसरे, अरबाज मणेर, अलमास मुमेरे, गौरी बारटक्के, प्रियांका धनावडे, रवींद्र चाळके, संजना शिंदे, सुप्रिया जाधव, रोशन चाफेकर आणि अजित मोरे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना शहरप्रमुख मंगेश रावकर, शिवसेना (ऊबाठा)चे शहरप्रमुख राजेश काफरे तसेच भाजपचे शहराध्यक्ष सुमित रिसबुड या तिन्ही शहरप्रमुखांचा पराभव झाला. काँग्रेसचे विकास साळवी, यास्मिन पेडेकर, राखी शेडगे, विनोद सावंत तसेच शिवसेनेचे मंगेश रावकर व शाहीन कागदी यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
..................
अष्टमीत अपक्षांचा बालेकिल्ला ढासळला
अष्टमी गावात यापूर्वी दोन वेळा अपक्ष उमेदवार निवडून आल्याने हा भाग ‘अपक्षांचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जात होता. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आले, तर फरहा पानसरे यांनी विजय मिळवत अपक्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. सध्या अष्टमीतील चारही जागा राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com