घातक रसायनांचे ठेकेदार

घातक रसायनांचे ठेकेदार

Published on

घातक रसायनांचे ठेकेदार
बोईसरमध्ये सांडपाण्याची चोरून विल्हेवाट
संतोष घरत ः सकाळ वृत्तसेवा
बोईसर, ता. २३ ः परिसरात रासायनिक सांडपाण्याचा काळाबाजार होत आहे. लहान वाहनांमधून रस्त्यालगतच लपूनछपून रसायनांची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे एकीकडे प्रशासकीय यंत्रणा प्रदूषण कमी झाल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे घातक रसायनांची अशा पद्धतीने बेकायदा विल्हेवाट लावण्याच्या प्रकाराने नागरिकांबरोबर पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
रासायनिक सांडपाण्याच्या वाहतूक प्रक्रियेला होणारा खर्च टाळण्यासाठी काही कारखानदार सांडपाण्याच्या चोरट्या पद्धतीने वाहतूक करून विविध ठिकाणी साठवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी काहीजणांची टोळीच सक्रिय आहे. या माफियांना
रसायनांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आहे. लहान वाहनांच्या मदतीने घातक सांडपाणी महामार्गालगत, नाल्यांमध्ये, निर्जन जागी आणि नियोजनपूर्वक ठरवलेल्या ठिकाणी चोरट्या मार्गाने विल्हेवाट लावत आहे. यापूर्वीही सरावली, ७० बंगला परिसर, मान, वारंगडे, बेटेगाव, कोळवडे आणि इतर ठिकाणी अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही ठिकाणी तर कूपनलिकांमध्ये छुप्या पद्धतीने रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळ जमीन, पाण्याबरोबर पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
-------------------------------------
प्रदूषणात वाढ
- बोईसर-चिल्हार मार्गावरील गुंदला, दोन बंगला परिसरातून जाणाऱ्या कार क्रमांक एमएच ०४ सीई-४०५५ मधून घातक रासायनिक सांडपाणी सांडत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या मार्गालगत बेटेगाव, नागझरी पोलिस चौकी असूनही असे प्रकार सर्रासपणे होत आहेत.
- घातक रासायनिक द्रव्यांची चोरट्या मार्गाने करण्यात येणारी विल्हेवाट ही सर्वसामान्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी बाब आहे. या प्रकारामुळे हवा, पाणी व जमिनीचे प्रदूषण वाढून नागरिकांच्या जीवितास आणि पर्यावरणास कायमस्वरूपी हानी पोहोचू शकते.
-------------------
पळवाटांचा आधार
प्रदूषण नियंत्रण मंडळ काही कारखान्यांवर कारवाई करत असल्याचे दाखवते; मात्र कारवाईपेक्षा केवळ दिखावा असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी रासायनिक सांडपाणी साठवले जाते, अशा ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई होणे गरजेचे असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तर जिथे हा प्रकार उघडकीस येतो त्या ठिकाणी कारखान्यांवर नोटिसा बजावण्याची किरकोळ कारवाई केली जाते.
--------------------------
क्लोजर नोटीस दिल्यानंतरही संबंधित कारखानदार पळवाटा काढून पुन्हा परवाने मिळवतात. काही दिवसांनी पुन्हा पूर्वीसारखीच बेकायदेशीर सांडपाणी विल्हेवाट सुरू होते. यामुळे रासायनिक सांडपाणी आणि घनकचऱ्याचा काळाबाजार अद्यापही सुरूच आहे.
- केतन राऊत, अध्यक्ष, मानवी सुरक्षा आणि भ्रष्टाचार निर्मूलन संस्था, पालघर
--------------------------
तळोजा येथील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये नेऊन तांत्रिकदृष्ट्या एका टँकरमधून पाठवणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया खर्चिक असल्याने पैसे वाचविण्याकरिता काही कारखाने असे प्रकार करतात. या प्रकरणांमध्ये क्षेत्रिय अधिकाऱ्यांना पाठवून चौकशी केली जाईल.
- वीरेंद्र सिंग, उपप्रादेशिक अधिकारी, तारापूर-२

Marathi News Esakal
www.esakal.com