अजित पवार गटाची स्वबळाची तयारी
महायुतीत अंतर्गत कलह
ठाणे पालिकेसाठी अजित पवार गटाचा ''स्वबळा''चा इशारा; आनंद परांजपे यांनी फुंकले रणशिंग
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘‘सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही १३१ जागांवर स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत,’’ असा थेट इशारा माजी खासदार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाचे बैठकीचे सत्र सुरू आहे. मात्र, या चर्चेपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लांब ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आनंद परांजपे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘घटक पक्षांकडून जागावाटपाच्या बैठकीचे निमंत्रण आल्यावरच आम्ही आमचा आकडा जाहीर करू, पण डावलले गेल्यास स्वबळाचा पर्याय खुला आहे,’’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. या वेळी परांजपे यांनी पक्षांतर्गत महत्त्वाच्या निर्णयाचीही माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली असून, हा पूर्णपणे पक्षाचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३८० इच्छुकांच्या मुलाखती
ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी आधीच स्वबळाचा नारा देत इच्छुकांसाठी अर्जवाटप सुरू केले आहे. आतापर्यंत ३८० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, पक्ष कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
विरोधी पक्षांवर टीका
नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने २१५ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणत मोठे यश मिळवले आहे. यावर भाष्य करताना परांजपे म्हणाले की, विरोधक ईव्हीएमवर दोष देत असले तरी जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे.
नाराजीचा सूर
सन्मानजनक जागा न मिळाल्यास ठाण्यातील सर्व १३१ जागांवर स्वबळाची तयारी अजित पवार गटाने दर्शवली आहे. तसेच महायुतीच्या जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत स्थान न मिळाल्याने नाराजीचे सूर आहे. सध्या ३८० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली जात आहे.

