हातोली'' मिठाई तयार करण्याची लगबग
हातोली मिठाई तयार करण्याची लगबग
मुरबाड, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली मुरबाड तालुक्यातील म्हसोबा यात्रा येत्या ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुरबाडमध्ये मिठाई तयार करण्याच्या कामाला वेग आला असून, दुसरीकडे महावितरणनेही यात्रेदरम्यान वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत.
यात्रेच्या काळात लाखो भाविक आणि व्यापारी म्हसा गावात दाखल होतात. या वेळी वीजपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून महावितरणने बुधवारी विशेष मोहीम राबवली. मुरबाड ते म्हसा मार्गावरील उच्चदाब वाहिनी, विद्युत पोल आणि तारांची दुरुस्ती करण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सासणे, पाटगाव, नारीवली आणि आगाशी या चार फिडरवरील दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याने यात्रा काळात अखंडित वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिठाईचा सुगंध दरवळला
म्हसोबा यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील हातोली, जांभूळ आणि खाजा ही मिठाई. यात्रेत हजारो किलो मिठाईची विक्री होते. ‘हातोली’ ही मिठाई आधीच तयार करून ठेवली जाते आणि यात्रेच्या दिवशी साखरेच्या पाकात भिजवून ती गरमागरम खवय्यांना दिली जाते. मुरबाडमधील प्रसिद्ध मिठाई व्यापारी सुनील तेलवणे, साईनाथ शिंदे, संतोष रोठे यांसह अनेक व्यावसायिकांनी सध्या ‘हातोली’ तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष बस
गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत शेकडो दुकाने, सर्कस आणि मनोरंजनाचे खेळ थाटले जातात. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी कल्याण, मुरबाड, नेरळ, कर्जत आणि वसई येथून विशेष बस गाड्यांची सोय करण्यात येणार आहे.

