सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र निवडणूक लढविणार
खारघर, ता. २३ (बातमीदार) : उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, तसेच नगरसेवक निवडून आल्याने उरणसह पनवेल महापालिका हद्दीतील मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सन्मानपूर्वक जागा मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आवश्यक जागा न मिळाल्यास पक्षाकडून स्वतंत्र्य निवडणूक लढवली जाईल, असे पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पालिका निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून दांडगा जनसंपर्क आणि आर्थिक बाबतीत सक्षम असलेला उमेदवार निवडीवर आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे. पनवेल महापालिकाशेजारील उरणमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षासह नऊ नगरसेवक निवडून झाल्यामुळे पालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली असून, आघाडीतील पक्षात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असल्याचे समजले. उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले आहे. मविआकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक जागा मिळावी, ही कार्यकर्त्यांची मागणी आहे.
पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २० ठिकाणी इच्छुक आणि सक्षम उमेदवारांची नावे पक्षाकडे प्राप्त झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास पक्षाकडून स्वतंत्र्य निवडणूक लढवली जाईल, असे पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

