पालिका मुख्यालयात माध्यम संनियंत्रण कक्ष स्थापन
पालिका मुख्यालयात माध्यम संनियंत्रण कक्ष
भिवंडीत जाहिरातींचे ‘पूर्वप्रमाणन’ अनिवार्य; आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक सज्ज
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा बसावा, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयात या समितीचा विशेष कक्ष कार्यान्वित झाला असून, राजकीय जाहिराती आणि ‘पेड न्यूज’वर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अनमोल सागर यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, निवडणूक विभाग उपायुक्त विक्रम दराडे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी समितीचे सदस्य असतील, तर भिवंडी महापालिका जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी हे सदस्य सचिव असतील. अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके (आचारसंहिता पथक प्रमुख) यांच्याकडे पेड न्यूजवर लक्ष ठेवण्याची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांचे २४ तास निरीक्षण
पालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या या कक्षात अधिकारी आणि कर्मचारी दृकश्राव्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचे २४ तास निरीक्षण करतील. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या प्रचारावर आणि समाजमाध्यमांवरील मजकुरावर या समितीचे नियंत्रण असेल. ज्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन केलेले नसेल, अशा जाहिरातींचे प्रसारण करणे कायदेशीर गुन्हा ठरेल. उमेदवारांनी प्रचारासाठी नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लेखी परवानगी बंधनकारक
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, खालीलपैकी कोणत्याही माध्यमाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी समितीकडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे : दूरदर्शन, सॅटेलाइट चॅनल्स, केबल नेटवर्क, आकाशवाणी आणि खासगी एफएम.
डिजिटल प्लॅटफॉर्म : यूट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप (बल्क एसएमएस), ई-वृत्तपत्रे आणि संकेतस्थळे.
सार्वजनिक ठिकाणे : सिनेमागृहे, ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्ले आणि व्हॉइस मेसेज.

