गावागावांत रंगल्या निवडणुकीच्या बाता
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गावागावात, चौकाचौकांत निवडणुकीच्या बाता रंगू लागल्या आहेत. चहाच्या टपऱ्यांपासून मंदिराच्या ओट्यांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत एकच चर्चा, या वेळी कोण जिंकणार, कोणाचा महापौर पालिकेत बसणार, आदी चर्चांना उधाण आले आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगले आहेत. गेल्या कार्यकाळातील अपयश, अपूर्ण विकासकामे, नागरी सुविधांचा बोजवारा यावरून राजकीय नेते परस्परांवर तुटून पडले आहेत. गावागावात अचानक वाढलेले राजकीय सक्रियतेचे दर्शन लक्षवेधी ठरत असून, निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार पुन्हा मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. वर्षानुवर्षे न दिसणारे चेहरे अचानक जनतेत मिसळताना दिसत आहेत.
एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अद्याप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज जरी भरला नसला तरी इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात विविध कार्यक्रम, मेळावे, हळदी-कुंकू आदी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. जाहीर प्रचार अद्याप सुरू झाला नसला तरी वैयक्तिक भेटीगाठी सुरूच आहेत. यंदाच्या निवडणुका पॅनेल पद्धतीने होणार असल्याने इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दुसरीकडे, सामान्य नागरिक मात्र ‘निवडणूक आली की विकासाची आठवण का?’ असा प्रश्न उपस्थित करत आहेत. पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छतेचा प्रश्न, भटकी कुत्री, उंदीर आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर ठोस भूमिका कोण घेणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
मतदारांवर छाप पडण्याचे काम
गाव-गावठाण, झोपड्या व नोड ढवळून निघाली आहेत. भाऊबंदकी उफाळून आली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. प्रचारासाठी यंदा वेगवेगळे तंत्र वापरले जात आहे. त्यात समाजमाध्यमाचा वापर अधिक वाढला आहे. इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवकांनी तर आपापल्या प्रभागातील मतदारांचा वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला असून, आपल्या कामाचा व प्रभागात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत मतदारांवर आपली छाप पडण्याचे काम जोमात सुरू आहे.

