निवडणूक प्रक्रियेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोपरखैरणे व घणसोली परिसरातील काही प्रमुख मार्ग नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत.
कोपरखैरणे विभागातील प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १३ साठी उमेदवारी अर्जवाटप, स्वीकार, मतपेटी वाटप, स्ट्रॉगरूम, तसेच मतमोजणी आदी सर्व निवडणूक प्रक्रिया सेक्टर ५ येथील अण्णासाहेब पाटील सभागृहात पार पडणार आहे. या सभागृहाकडे जाण्यासाठी तीन टाकी चौक ते हॉटेल ॲल्ट्रस्ट चौक हा मुख्य रस्ता वापरण्यात येणार असून, या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
घणसोली विभागातील प्रभाग क्रमांक ६, ८ व ९ साठी निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया सेक्टर ७ येथील समाजमंदिर हॉलमध्ये पार पडणार आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी घणसोली मुख्य रस्ता, हरी कॉम्प्लेक्सपासून महापालिका शाळा क्रमांक ७६ समोरील चौकापर्यंतचा रस्ता वापरला जाणार आहे. या मार्गावर वाहने उभी केल्यास कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा रस्ता नो पार्किंग झोन घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी १७ जानेवारीपर्यंत तीन टाकी चौक ते हॉटेल ॲल्ट्रस्ट चौक, तसेच घणसोली मुख्य रस्ता हरी कॉम्प्लेक्स ते मनपा शाळा क्रमांक ७६ समोरील चौक हा संपूर्ण मार्ग नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

