''नवरंग''चा दुसरा वर्धापनदिन लवकरच
‘नवरंग’चा दुसरा वर्धापनदिन लवकरच
एकांकिकांचे होणार सादरीकरण
नेरूळ, ता. २३ (बातमीदार) : नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई या संस्थेचा दुसरा वर्धापनदिन बुधवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नेरूळ येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे साजरा होणार आहे. यावर्षी हा वर्धापनदिन एकांकिका सादरीकरणाने साजरा होणार आहे.
या कार्यक्रमात घनश्याम परकाले लिखित ‘वारी’ तसेच अनिल मुनघाटे लिखित ‘एक होता मास्तर’ या दोन एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमास ‘साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य’चे उपाध्यक्ष प्रदीपजी ढवळ, को.म.प.सा.चे विश्वस्त प्रा. एल. बी. पाटील, ज्येष्ठ लेखक प्रा. अजित मगदूम, साहित्य मंदिरचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी रवी वाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचे अध्यक्ष गजानन म्हात्रे, कार्यवाह घनश्याम परकाले, उपाध्यक्ष अनिल मुनघाटे व खजिनदार पाकिजा आत्तार यांनी साहित्य, नाट्य व संस्कृतीप्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

