बदलत्या ठाण्याचे वास्तव मांडणारा ''वंचितांचा रंगमंच''
बदलत्या ठाण्याचे वास्तव मांडणारा ‘वंचितांचा रंगमंच’
नाट्यजल्लोषातून मुलांचे सामाजिक प्रश्नांवर भाष्य
ठाणे, ता. २३ (बातमीदार) : वेगाने होणारे शहरीकरण, पुनर्विकासामुळे बदललेली जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणारे गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न... बदलत्या ठाण्याचे हेच वास्तव यंदा ‘वंचितांच्या रंगमंचावर’ अतिशय प्रभावीपणे उमटले. रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोषात वंचित वस्त्यांमधील मुलांनी आपल्या अभिनयातून ठाण्याच्या परिवर्तनाची कथा जिवंत केली.
‘बदलते शहर’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या महोत्सवात ठाणे आणि परिसरातील वस्त्यांमधील मुलांनी सहभाग घेतला होता. सुप्रसिद्ध रंगकर्मी सुप्रिया मतकरी-विनोद यांनी या वेळी नमूद केले की, ‘‘वंचितांचा रंगमंच ही केवळ नाट्य चळवळ नसून वंचित घटकांच्या भावना आणि प्रश्नांना वाचा फोडणारे एक महत्त्वाचे सामाजिक व्यासपीठ आहे.’’ ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांची ही संकल्पना समता विचार प्रसारक संस्थेने गेली १२ वर्षे समर्थपणे पुढे नेली आहे.
नाट्यजल्लोषात विविध गटांनी सादर केलेल्या नाटिका प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेल्या. कळवा भीमनगर येथील मुलींनी ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या नाटिकेने शिक्षणातून येणारा आत्मविश्वास आणि भीतीवर केलेली मात याचे प्रभावी चित्रण केले. घणसोलीतील वी नीड यू संस्थेच्या मुलांनी ‘नवी एकजूट’ या नाटिकेतून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे निर्माण होणारा भावनिक संघर्ष मांडला. किसननगर गटाने ‘मी रंगायतन’ या नाटिकेने ठाण्यातील वैभवशाली रंगभूमीचा प्रवास सर्जनशीलतेने उलगडला. रमाबाई आंबेडकर नगरातील मुलांनी ‘आमचे ठाणे’ या नाटिकेच्या माध्यमातून स्वच्छता आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर प्रकाश टाकत नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मो. ह. विद्यालयातील मुलांनी ‘इये मराठीचीये नगरी’ या नाटिकेने मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल जनजागृती केली.
सांस्कृतिक ठसा
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बालकलाकारांचे कौतुक करत या उपक्रमाच्या सामाजिक योगदानावर भर दिला. वस्त्यांमधील या छोट्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून केवळ मनोरंजनाऐवजी बदलत्या ठाण्याचे गंभीर वास्तव मांडले, जे उपस्थितांना विचार करायला लावणारे ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

