

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी युती करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र ही युती करणे दोन्ही पक्षांतील नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना अवघड जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडे सध्या ५६ जागांवर स्थानिक नगरसेवक आहेत, तर भाजपकडेही ५६ पेक्षा अधिक माजी नगरसेवकांची ताकद असल्याने कोणीही माघार घेण्यास तयार नाही. दोघांकडून रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीच घोडे अडकून पडले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीत ३८ नगरसेवकांची ताकद होती. दरम्यान, गेल्या वर्षभरात १८ हून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटाकडे आले आहेत. त्यामुळे शिंदे गटामध्ये माजी नगरसेवकांचे संख्याबळ वाढले आहे, तर भाजपकडे राष्ट्रवादीकडून आलेल्या माजी नगरसेवकांच्या ताकदीमुळे त्याची संख्याही वाढलेली आहे. एवढ्या सर्व नगरसेवकांना उमेदवारी देणे, हे महायुतीमध्ये शक्य होत नसल्याने वेगवेगळे लढणे योग्य असल्याचे मत दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. या सर्वांना उमेदवारी देऊन न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे. स्वतंत्र लढल्यास यांना न्याय देता येणार आहे. तरीसुद्धा वरिष्ठ जे आदेश देतील ते आमच्यासाठी अंतिम असेल.
- किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
----
महायुतीच्या चर्चेत अजित पवार गटाचा विसर
नवी मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : महापालिका निवडणुकीत कोणाला किती जागा सोडायच्या आणि महायुती करायची की नाही, ही चर्चा शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू आहे. या चर्चेत महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मात्र कोणतेही आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किमान ५० पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे.
नवी मुंबई शहरात महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांत चर्चा थंडावलेली आहे. शिवसेना आणि भाजप हे स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत असताना दोघांच्याही पक्षश्रेष्ठींनी महायुती करून निवडणूक लढविण्याचे घोषित केले आहे. अशा परिस्थिती अजित पवार गटाला कोणत्याच चर्चेत सहभागी करून घेण्यात असलेले नाही. अजित पवार गटाकडून पूर्वी माजी नगरसेवक नामदेव भगत हे पक्षाची धुरा सांभाळत होते. परंतु नुकतेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार गटाकडे जिल्हाध्यक्ष नव्हते. या दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. जाधव यांच्यावर आता नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अजित पवार गटाने दिली आहे. नवी मुंबईत भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात येणार आहे.
जाधव आणि त्यांची पत्नी दोघेही सीवूड्स परिसरातील नगरसेवक आहेत. भाजपमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याने नाराज होऊन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तसेच स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने पक्ष तयारी करीत असून, ५० पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.
महायुतीबाबत वरिष्ठ निर्णय घेणार
सध्या अजित पवार गटाकडे एकही स्थानिक माजी नगरसेवक नाही, मात्र यापूर्वी महापालिकेत २०१५ला राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागा महायुतीकडे मागणार आहे. महायुतीबाबत अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे निर्णय घेतील, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.