उलव्यात पेट्रोल टंचाई
उलव्यात पेट्रोल टंचाई
अवैध पेट्रोल विक्री बंद; कारवाई झाली, पण सुविधा नाही
उलवे, ता. २३ (बातमीदार) : उलवे परिसरात चक्क्याद्वारे सुरू असलेल्या पेट्रोलच्या बेकायदा विक्रीवर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने कारवाई करीत अनेक ठिकाणची अवैध पेट्रोल विक्री बंद केली आहे. ही कारवाई योग्य व स्वागतार्ह मानली जात असली तरी त्यानंतर उलवे परिसरात पेट्रोलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वी आपत्कालीन गरजांसाठी का होईना, छोट्या प्रमाणात पेट्रोल उपलब्ध होत होते. मात्र अवैध विक्री पूर्णपणे बंद झाल्याने आता दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना बेलापूर, जासई, उरण किंवा नेरूळ येथे पेट्रोलसाठी जावे लागत आहे. यामुळे वेळ, इंधन आणि पैशांचा अतिरिक्त खर्च वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. विशेषतः सकाळच्या कार्यालयीन वेळेत किंवा आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोलअभावी वाहन अडकण्याच्या घटना वाढल्याचेही सांगण्यात येत आहे.
उलवे हे वेगाने विकसित होत असलेले शहर असून, येथे हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र आजतागायत एकही अधिकृत पेट्रोल पंप उपलब्ध नसणे, ही गंभीर बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
चौकट
नागरिकांची आग्रही मागणी
उलवे नोडमध्ये किमान एक तरी अधिकृत पेट्रोल पंप तातडीने सुरू करण्यात यावा तसेच सिडको व संबंधित तेल कंपन्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी एकमुखी मागणी रहिवाशांकडून होत आहे. अवैध पेट्रोल विक्रीवर कारवाई आवश्यक असली तरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

