ग्रंथालयातील विद्यार्थ्याचे एमपीएससीत यश
ग्रंथालयातील विद्यार्थ्याचे एमपीएससीत यश
उरण, ता. २३ (वार्ताहर) : उरण नगर परिषदेच्या माॅंसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालय येथील अभ्यासिकेत नियमित अभ्यास करणारे माजी सैनिक राहुल पाटील यांनी नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्यांची निरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या अभ्यासिकेत विद्यार्थी दररोज १० ते १२ तास अभ्यास करतात. अनेकदा वीज खंडित झाल्यावरही मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अभ्यास सुरू ठेवण्याची जिद्द येथे पाहायला मिळते.
या यशाबद्दल ग्रंथपाल संतोष पवार, कर्मचारी जयेश वत्सराज, ॲड. निरंतर सावंत व सहकारी विद्यार्थ्यांनी राहुल पाटील यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान केला. या यशाचे श्रेय त्यांनी ग्रंथालयाला देत हे ग्रंथालय माझ्यासाठी मंदिरासारखे आहे, असे नम्रपणे सांगितले.

