खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा?

खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा?

Published on

खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा?
खड्डेमय रस्ते मृत्यूचा सापळा
एका वर्षात २२ बळी; महिन्याला खड्ड्यांच्या सरासरी पाच तक्रारी, रस्त्यांची चाळण

ठाणे, ता. २३ : ठाणे शहराला खड्डेमुक्त करण्याच्या घोषणा केवळ हवेतच विरल्या असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. २०२५ या वर्षात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत तब्बल २२ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावर न्यायालयात याचिका दाखल असतानाही ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात दर महिन्याला सरासरी पाच खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे शहरात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. दक्ष नागरिक रोहित गायकवाड यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा २२ वर पोहोचला असून, यामध्ये गेल्या काही दिवसांत चार नवीन बळींची भर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हीच का खड्डेमुक्ती, असा संतप्त सवाल ठाणेकर विचारत आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २० डिसेंबर या कालावधीत एकूण ५८ तक्रारी नोंदवण्यात आल्या. यामध्ये पावसाळ्यानंतरचा काळ म्हणजेच सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या असल्या तरी रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. ठाण्यातील रस्त्यांसाठी ६०५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. यातून डांबरीकरण, यूटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रीटीकरण अशा २८२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली; मात्र एवढा अवाढव्य खर्च होऊनही शहरातील रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे.

खड्ड्यांचा आकडा गुलदस्त्यात
पावसाळ्यात खड्ड्यांचा अधिकृत आकडा देण्याची पद्धत पूर्वी होती. मात्र महापालिकेत प्रशासकीय राजवट आल्यापासून खड्ड्यांची संख्या जाहीर करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत नेमके किती खड्डे पडले आणि किती बुजवले गेले, याची माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारींचा महिनावार तक्ता (२०२५)
महिना तक्रारींची संख्या
जानेवारी ५
फेब्रुवारी २
मार्च ५
एप्रिल ०
मे ४
जून ३
जुलै ८
ऑगस्ट ८
सप्टेंबर १५
ऑक्टोबर २
नोव्हेंबर ४
डिसेंबर २
एकूण ५८

Marathi News Esakal
www.esakal.com