कुडूस येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याला मंजुरी

कुडूस येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याला मंजुरी

Published on

कुडूस येथे स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर
चोरी, हाणामारीच्या घटनांना लागणार लगाम?

वाडा, ता. २३ (बातमीदार) : वाढत्या औद्योगिकीकरणासोबत चोरी, हाणामारी, लूटमार अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने वाडा तालुक्यातील कुडूस येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर नवीन पोलिस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या पोलिस ठाण्यामुळे चोरी, हाणामारीच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाडा तालुक्यातील कुडूस औद्योगिक क्षेत्राची तसेच ग्रामीण परिसराची सुरक्षितता गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः रामभरोसेच होती. कुडूस परिसराची लोकसंख्या एक लाखाच्याही पुढे गेली असून, औद्योगिक पट्ट्याचा वाढता पसारा पाहता अवघ्या सात पोलिसांवर या परिसराची सुरक्षितता अवलंबून होती. त्यामुळे चोरी, हाणामारी, लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुडूस येथे स्वतंत्र पोलिस ठाणे व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील राजकीय पक्ष व सामाजिक संघटना प्रयत्नशील होत्या. अखेर नवीन पोलिस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत कुडूसमधील रहिवाशांसाठी सध्या उपलब्ध असलेले पोलिस बळ अत्यंत कमी आहे. कुडूस बाजारपेठेत वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी भीती व्यक्त करीत आहेत. त्यासाठी कुडूस पोलिस चौकीला पोलिस ठाण्याचा दर्जा मिळाल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत होईल, असा विश्वास कुडूस व्यापारी संघटनेचे सल्लागार श्रीकांत भोईर यांनी व्यक्त केला.
कुडूस पोलिस चौकीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा मिळायला हवा, यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. त्याला आज यश मिळाले असल्याचे कुडूसचे माजी उपसरपंच डाॅ. गिरीश चौधरी यांनी सांगितले.


४० पदे मंजूर

वाडा पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन कुडूस पोलिस ठाणे हे उपलब्ध मनुष्यबळातून निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे एक पद, पोलिस उपनिरीक्षकाचे एक पद, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची दोन पदे, पोलिस हवालदाराची आठ पदे, पोलिस शिपाईची २८ पदे अशी एकूण ४० पदे येथे मंजूर करण्यात आली आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com