घरकुल मजुरी रखडली

घरकुल मजुरी रखडली

Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २३ : तालुक्यात विविध घरकुल योजनांतर्गत बांधकामासाठी राबलेल्या पाच हजार ७९२ मजुरांची १६ कोटी २१ लाख ७६ हजार रुपयांची मजुरी संगणकीय प्रणालीतील बदलांमुळे दीड वर्षांपासून रखडली आहे. वारंवार मागणी करूनही ही रक्कम अद्याप अदा न झाल्याने संतप्त मजुरांनी सोमवारी (ता. २९) शहापूर पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे मजूर सध्या शहापूरमध्ये एकवटले आहेत.
सरकारच्या विविध घरकुल योजनांद्वारे आदिम कातकरी समाजासह इतर गरीब, भूमिहीन व वंचित कुटुंबांना निवाऱ्याचा मूलभूत हक्क मिळावा, या उद्देशाने घरकुल मंजूर केली जातात. सरकारी निर्णयानुसार घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानासोबतच बांधकामासाठी लागणारी मजुरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) देणे बंधनकारक आहे. मात्र, शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे स्वतःच्या कष्टाने पूर्ण केली असतानाही पाच हजार ७९२ घरकुल लाभार्थ्यांना दीड वर्षापासून मजुरी मिळालेली नाही.
उपजीविकेचे कोणतेही ठोस साधन नसताना अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून, उधारीवर बांधकाम साहित्य आणून व स्वतः श्रम करून घरकुले उभी केली आहेत. मात्र, सरकारकडून मिळणारी मजुरी दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने या कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. मजुरी न मिळाल्यामुळे अनेकांच्या रोजच्या अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला असून काही घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत अडकली आहेत. याप्रकरणी वारंवार तोंडी पाठपुरावा करूनही शहापूर पंचायत समितीकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने २९ डिसेंबरला शहापूर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित मजुरी अदा करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


नवीन प्रणालीमुळे विलंब
ज्या लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम टप्पानिहाय पूर्ण झाले आहेत, अशांच्या घरकुलाचे फोटो तत्काळ अपलोड करण्याबाबत गृहनिर्माण अभियंत्यांना बैठक घेवून सुचना दिल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झाली आहेत, त्यांना शेवटचा हप्ता वर्ग करताना मजुरीचे संपूर्ण मस्टर निघाले आहे की नाही याची खात्री करूनच अंतिम घरकुलाचा फोटो अपलोड करण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण झालेले असून पुढील मस्टर येण्यासाठी शेवटचे अनुदान मिळण्यास थोडा विलंब होत आहे. लाभार्थ्यांचे अनुदान वर्ग होण्यासाठी नवीन प्रणालीचे काम सुरू असल्याने मध्यंतरी अनुदान जमा होत नव्हते. ते आता लवकरच होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी बी. एच. राठोड (पंचायत समिती, शहापूर) यांनी दिली आहे.


सरकारमार्फत १४ ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्यासाठी ‘एसएनए स्पर्श’ ही नवी संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे अनुदान जमा होण्यास विलंब झाला. मात्र आता ही प्रणाली सुरळीत सुरू असून, लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी एफटीओ तयार करण्यात आले आहेत. संबंधित माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे येथे पाठविण्यात आली असून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान लवकरच वर्ग करण्यात येईल.
- बी. एच. राठोड, गटविकास अधिकारी,
पंचायत समिती, शहापूर

रोहयो योजनेच्या मजुरांची कामाची मोठी रक्कम दीड ते दोन वर्षांपासून रखडली आहे. येथील मजुरांच्या हाताला एक तर काम नाही आणि केलेल्या कामाची मजुरी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे येत्या २९ डिसेंबरला शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयाला मोर्चा काढणार आहोत.
- प्रकाश खोडका, तालुका सचिव, श्रमजीवी संघटना

मजुरांचे स्थलांतर
केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून विकसित भारत जी रामजी योजना असे गोंडस नामकरण केले आहे. प्रत्यक्षात मात्र शहापूरसारख्या दुर्गम, ग्रामीण, आदिवासीबहुल तालुक्यात रोजगारच मिळेनासा झाल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी, आदीम कातकरी जमातीतल्या मजुरांनी पोटासाठी कुटुंबांसह स्थलांतर केले आहे. कर्ज काढून, उसनवारी घेऊन दिवस कसे तरी लोटण्याची वेळ मजुरांवर आली आहे. मात्र, हेच कर्ज आणि उसनवारी फेडण्यासाठी हाताला काम शोधत अनेक मजुरांच्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com