भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज

Published on

भिवंडी, ता. २३ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका निःपक्ष, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी अनमोल सागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, उपविभागीय अधिकारी अमित सानप, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, नयना ससाणे, उपायुक्त विक्रम दराडे, बाळकृष्ण क्षीरसागर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी एकूण सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे प्रभागनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत गायकवाड यांचे कार्यालय मिल्लत नगर येथील फरहान हॉलमध्ये असून, त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक ३, ४ व १० आहेत. हर्षलता गेडाम यांचे कार्यालय भादवड संपदा येथील नाईक हॉल (तळमजला) येथे असून, त्यांच्याकडे प्रभाग ९, ११ व १२ आहेत. स्वरूप कंकाळ यांचे कार्यालय नाईक हॉल, भादवड संपदा (पहिला मजला) येथे असून प्रभाग १३, १४, १५ व १६ त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात.
गोविंद खामकर यांचे कार्यालय कामतघर येथील वऱ्हाळ देवी माता बहुउद्देशीय सभागृह (तळमजला) येथे असून त्यांच्याकडे प्रभाग १७, २१, २२ व २३ आहेत. इजाज अहमद यांचे कार्यालय धोबी तलाव येथील अल्हाज शाह मोहम्मद सभागृह (तळमजला) येथे असून त्यांच्याकडे प्रभाग १८, १९ व २० आहेत. अमित सानप यांचे कार्यालय कोंबडपाडा येथील स्व. राजय्या गाजंगी बहुउद्देशीय सभागृह (तळमजला) येथे असून, प्रभाग १, ६ व ७ त्यांच्या अखत्यारीत आहेत. महेश हरिश्चंदे यांचेही कार्यालय याच सभागृहात असून त्यांच्याकडे प्रभाग २ व ५८ आहेत.

आचारसंहिता अंमलबजावणी जबाबदारी
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीची प्रमुख जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रत्येकी पाच आणि एक मुख्य असे एकूण सहा आचारसंहिता भरारी पथक, व्हिडिओ व्हिव्हिंग टीम, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक तसेच मतदान जनजागृती पथक तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात एक महिला ‘गुलाबी मतदान केंद्र’ तसेच एक पथदर्शी मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सागर यांनी दिली.

पोलिस यंत्रणाही तयारीत
निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. संवेदनशील व अती संवेदनशील मतदान केंद्रांबाबत बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

दृष्टिक्षेप
एकूण मतदार - ६,६९,०३३
पुरुष मतदार - ३,८०,६२३
महिला मतदार - २,८८,०९७
इतर मतदार - ३१३

एकूण मतदान केंद्र - ७५०
मतदान यंत्रे - ८२०
बॅलेट युनिट - १६४०

Marathi News Esakal
www.esakal.com