दुगाड फाटा भातखरेदी केंद्राचे उद्घाटन
वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा येथे आधारभूत भातखरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या धोरणांनुसार थेट भातविक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
दुगाड फाटा येथील हे भातखरेदी केंद्र १५ ते २० वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे. भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा या केंद्रावर मोठा विश्वास आहे. आधारभूत दराने भातखरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळत आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूटमार, वजनात कपात; तसेच दरांतील फसवणूक या केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात थांबली आहे. याप्रसंगी अनंत पाटील यांनी, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या मालाला योग्य आणि न्याय्य दर मिळणे अत्यावश्यक आहे. सरकारच्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अशा आधारभूत भातखरेदी केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्याला मोहन अंधेरी, गणेश पाटील, शिवाजी राऊत, मिठाराम पाटील, लहू घोडविंदे, विष्णू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूक खर्च कमी
भातखरेदी केंद्रामुळे दुगाड फाटा व परिसरातील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी झाला असून वेळेत भातविक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांऐवजी सरकारच्या अधिकृत खरेदी केंद्रांकडे वाढताना दिसत आहे.

