सभागृहात महिलांचा बुलंद आवाज

सभागृहात महिलांचा बुलंद आवाज

Published on

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या ४९ जागांसाठी २ आणि २० डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर झाला. या निकालातून बदलापुरात महिलांनी नेतृत्वाची सूत्रे ठामपणे हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ४९ जागांपैकी तब्बल २७ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे महिलांची टक्केवारी ५५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
संविधानिक तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण असताना, त्याहून अधिक महिला निवडून येणे हा बदलापूरकरांचा त्यांच्यावरील विश्वास दर्शवणारा ठळक संकेत मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी मिळून ५४ महिला उमेदवारांना संधी दिली होती. त्यापैकी २७ महिला विजयी ठरल्या आहेत. यामध्ये शिवसेनेच्या १४, भाजपच्या १०; आणि राष्ट्रवादीच्या तीन महिला नगरसेविकांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने महिला नगरसेविका पहिल्यांदाच पालिकेत दाखल होत असल्याने शहरात ‘महिला राज’ ही संज्ञा चर्चेत आली आहे.
निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युतीने सत्ता स्थापन केली असून, नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता घोरपडे यांची निवड झाली आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने बदलापूरच्या प्रशासनाची धुरा महिला नेतृत्वाकडे जाणार आहे. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका दामले यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना हा संख्याबळाच्या दृष्टीने सर्वात मोठा पक्ष ठरला, तरी सत्तेचा कौल भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने लागला आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि अपक्ष उमेदवारांना मात्र मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे.
विशेष म्हणजे कोणतीही अधिकृत युती नसताना थेट लढतीत बदलापूरकरांनी भाजप-राष्ट्रवादीला सत्तेची संधी दिली आहे. महिलांची संख्या आणि सहभाग वाढल्याने पाच वर्षांत पालिकेच्या सभागृहात महिलांचा आवाज अधिक ठळकपणे ऐकू येणार असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीत ‘महिला राज’
बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये महिलांचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले आहे. राष्ट्रवादीने एकूण आठ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी सहा जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली होती. निकालानंतर राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी ठरले असून, विशेष म्हणजे तिन्ही विजयी उमेदवार महिला आहेत. त्यामुळे बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संपूर्णपणे ‘महिला राज’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महिलांना संधी देऊन त्या संधीचे सोने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या या यशाची शहरात विशेष चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या अनेक महिलांमुळे महिला वर्गाचा आत्मविश्वास वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com