युती जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची घोषणा
महायुती जाहीर झाल्यानंतरच जागावाटपाची घोषणा
खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, वरिष्ठांकडून युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच जागावाटपाचा अंतिम आकडा जाहीर केला जाईल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना मंगळवारी सुरुवात झाली. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हस्के यांनी पक्षाची भूमिका आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
मुलाखतींच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना म्हस्के म्हणाले, की सध्या विविध प्रभागांतील इच्छुकांशी संवाद साधला जात आहे. उमेदवार निवडताना त्याचे संघटनात्मक काम, जनसंपर्क आणि मुख्य म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट (निवडून येण्याची क्षमता) हेच निकष पाळले जातील. युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेच घेतील.
ठाकरेंच्या धरसोड वृत्तीवर प्रहार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना म्हस्के यांनी टोला लगावला. ते म्हणाले, की निवडणुकीच्या काळात अशा आघाड्या होतच असतात. आधी त्यांनी काँग्रेसला जवळ केले, आता मनसेकडे जात आहेत. ही धरसोड वृत्ती जनतेच्या पूर्णपणे लक्षात आली आहे. कदाचित उद्धव ठाकरेंकडे आता स्वतःचा जनाधार उरलेला नाही, हे काँग्रेसलाही उमजले असेल; म्हणूनच त्यांनी मुंबईत स्वबळाची भाषा सुरू केली आहे. उद्धव सेनेसाठी मुंबई ही केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यांच्या नेत्यांनी मुंबईबाहेर कधीच लक्ष दिले नाही. केवळ मुंबईची सत्ता मिळवून स्वतःचा फायदा करून घेणे, हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे, अशी टीका म्हस्के यांनी केली. उद्धव ठाकरे स्टेजवर असतील आणि राज ठाकरे बाजूला उभे राहतील, एवढंच चित्र या युतीत दिसेल, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

