पाकिस्तान कैदेतील मच्छीमारांना भारतात आणा
पाकिस्तानी कैदेतील मच्छीमारांना परत आणा
कुटुंबीयांचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना साकडे
पालघर, ता. २३ (बातमीदार) ः भारत पाकिस्तान समुद्री सीमेजवळ मासेमारी करताना चुकून समुद्री हद्द ओलांडल्याने पाकिस्तान सुरक्षा यंत्रणांनी कैद केलेले तब्बल दोनशे भारतीय अजूनही देशात परतलेले नाहीत. या दोनशे भारतीयांपैकी पालघर जिल्ह्यातील १९ जणांचा समावेश आहे. या मच्छीमारांची राष्ट्रीयत्वता सिद्ध झाली असून, त्यांची शिक्षाही संपली आहे. त्यानंतरही ते भारतात परतत नसल्याने मच्छीमारांच्या कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेऊन आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणारा आमचा पती, मुलगा, भाऊ भारतात आणण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केली.
मच्छीमार समाजाचे शिष्टमंडळ परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना सोमवारी दिल्लीमध्ये भेटले. पाकिस्तान तुरुंगात असलेल्या मच्छीमारांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलून विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मंत्र्यांना सांगितले. मच्छीमारांच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते जतिन देसाई आणि दिव-दमणचे खासदार उमेश पटेल शिष्टमंडळात होते.
मानवी हक्कांचे उल्लंघन
शिष्टमंडळातील महिलांनी त्यांचे पती, मूल पाकिस्तानच्या तुरुंगात असल्यामुळे आपलं जगणं अतिशय कठीण झाले असल्याचे साश्रूनयनांनी सांगितले. तुरुंगात असलेल्या आमच्या काही व्यक्तींची प्रकृती चांगली नसल्याचे पण परराष्ट्रमंत्र्यांना सांगण्यात आले. भारतीय मच्छीमार गेली तीन साडेतीन वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. सरकारकडून या प्रश्नावर सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांना सोडविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येईल, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या कुटुंबीयांना आश्वासन दिले. पाकिस्तान सुरक्षा यंत्रणांनी बंदी केलेल्या दोनशे मच्छीमार-खलाशी यापैंकी १७० जणांची शिक्षा कधीच पूर्ण झाली आहे. मात्र, त्यानंतरही तेथील सरकार त्यांना सोडत नाही हे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे देसाई यांनी यानिमित्ताने म्हटले आहे.
सोडण्याची तरतूद
भारत पाकिस्तानच्या कॉन्सुलर एक्सेस करारानुसार दोन्हीही देशातील मच्छीमार पकडले गेल्यानंतर त्यांची राष्ट्रीयत्वता सिद्ध झाल्याने त्यांना सोडण्यात यावे, अशी तरतूद आहे. भारतातील १७० आणि त्यापैकी पालघर जिल्ह्यातील १८ खलाशांची राष्ट्रीयत्वता केव्हाच सिद्ध झाली आहे. त्यानंतरही त्यांना सोडण्यात आलेले नाही. या खलाशी मच्छीमारांच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय आहे. त्यांना राज्याकडून जाहीर झालेली प्रतिदिन तीनशे रुपयेप्रमाणे देण्यात येणारे सहाय्यसुद्धा तुटपुंज्या प्रमाणात मिळालेले आहे. उर्वरित मदत अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे या गोरगरीब आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

